११ वी प्रवेश आॅफलाईन
By Admin | Updated: June 18, 2017 00:49 IST2017-06-18T00:49:25+5:302017-06-18T00:49:25+5:30
दहावीचा निकाल जाहीर होताच राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये अकरावीसाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

११ वी प्रवेश आॅफलाईन
अॅडमिशनचे नो टेन्शन : ३१ हजार विद्यार्थी, ३६ हजार जागा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दहावीचा निकाल जाहीर होताच राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये अकरावीसाठी आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यात यंदाही आॅफलाईन पद्धतीनेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे, दहावीत ३१ हजार ७२२ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असताना अकरावीकरिता जिल्ह्यात तब्बल ३६ हजार ४०० जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी यंदा ‘नो टेन्शन’ची स्थिती आहे.
१३ जून रोजी दहावीचा निकाल संकेतस्थळावर घोषित होताच अकरावी प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली. मात्र, जिल्ह्यात दहावीचे गुणपत्रक विद्यार्थ्यांना मिळाल्यावर म्हणजे, २४ जूनपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. प्रत्यक्षात २४ रोजी चौथा शनिवार, २५ रोजी रविवार आणि २६ रोजी रमजान ईदची सुटी आल्याने प्रवेश प्रक्रिया २७ जूनपासून खऱ्या अर्थाने सुरू होईल. विशेष म्हणजे, ही प्रवेश प्रक्रिया स्थानिक शाळा-महाविद्यालयस्तरावरच होईल.
जेथे माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक वर्ग जोडले आहेत, तेथे अकरावीसाठी ८० इतकी प्रवेश क्षमता मंजूर आहे. तर जेथे स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय आहे, तेथे १२० विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे. तसेच ज्या ठिकाणी उच्च माध्यमिक वर्ग महाविद्यालयांना जोडलेले आहेत, तेथेही अकराव्या वर्गात १२० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता शिक्षण विभागाने मंजूर केली आहे. जिल्ह्यात अकरावीकरिता ४५५ तुकड्यांना मान्यता असून क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश देऊ नये, अशा शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या सूचना आहेत. बारावीच्या प्रवेशाकरिताही हीच क्षमता मंजूर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या उपलब्ध जागा अधिक असल्याने विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. परंतु, ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघता एखाद्या विशिष्ट शाखेकरिता गर्दी होण्याचीही शक्यता आहे. तसेच गावातील उपलब्ध महाविद्यालयांपैकी एखाद्या विशिष्ट महाविद्यालयातच प्रवेश घेण्यासाठीही अर्जांची गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुणवत्तेच्या आधारावरच प्रवेश द्यावे लागणार आहे. विनाकारण आंदोलन केल्यास कारवाईचे निर्देश शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी दिले आहे.
शिक्षणाधिकारी कार्यालयाचे पथक प्रवेशासाठी वणीत
गेल्या वर्षी वणीतील दीडशे विद्यार्थ्यांना मोफत अकरावी प्रवेश मिळू शकला नव्हता. या विद्यार्थ्यांनी यवतमाळात येऊन वारंवार आंदोलनेही केली होती. वणीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण बघता यंदाही अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकमेव वणीमध्ये अकरावीसाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाचे पथक एलटी महाविद्यालयात दाखल होईल. तेथेच सर्व अर्ज स्वीकारून तेथूनच वणीतील चारही महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत.