११ हजार कृषिपंपांच्या जोडण्या खोळंबल्या

By Admin | Updated: October 7, 2015 02:54 IST2015-10-07T02:54:35+5:302015-10-07T02:54:35+5:30

मुख्यमंत्र्यांसह ऊर्जामंत्र्यांनी जिल्ह्यातील वीज जोडणीचा प्रश्न तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या होत्या.

11 thousand agricultural connections | ११ हजार कृषिपंपांच्या जोडण्या खोळंबल्या

११ हजार कृषिपंपांच्या जोडण्या खोळंबल्या

यवतमाळ : मुख्यमंत्र्यांसह ऊर्जामंत्र्यांनी जिल्ह्यातील वीज जोडणीचा प्रश्न तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. या विभागातील कर्मचाऱ्यांनी तसे आश्वासन मंत्री महोदयांना दिले होते. परंतु, हा कालावधी संपल्यानंतरही वीज वितरण कंपनीला कृषिपंपांची वीज जोडणी करता आली नाही. आजही ११ हजार कृषिपंपांच्या वीज जोडण्या वेटिंग आहेत. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे सिंचनाचा मोठा पेच निर्माण झाला आहे.
जिल्ह्यातील सिंचनाची संपूर्ण मदार कृषिपंपांच्या सिंचनावरच अवलंबून आहे. ८५ हजार कृषिपंप कार्यन्वित आहेत. यासोबतच ११ हजार ५०६ शेतकऱ्यांनी कृषिपंपांसाठी वीज वितरण कंपनीकडे कोटेशन भरले आहे. वीज जोडणीची मागणी केली आहे. यामधील अनेक अर्ज गत तीन वर्षांपासून खोळंबले आहेत. या कालावधीत शेतकऱ्यांसह शेतकरी परिवारातील कुटुंबांनी वीज कंपनीच्या शेकडो पायऱ्या झिजविल्या. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. यातून शेतकऱ्यांनी आशाच सोडली आहे.
यामुळे विहिरीची व्यवस्था असली तरी शेतकऱ्यांना सिंचन करताच आले नाही. यामुळे दुष्काळी स्थितीच्या संकटावरही शेतकऱ्यांना मात करता आली नाही. यातून शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका सहन करावा लागला.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी प्राथमिकता दिली आहे. या जिल्ह्यासाठी जातीने लक्ष देता यावे म्हणून स्वत: आढावा बैठक घेतली. अडचणी जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी अधिकाऱ्यांनीही होकार दिला.
या संपूर्ण प्रक्रियेचा जिल्हा प्रशासन पाठपुरावा करीत आहे. मात्र, कामाची गती वाढली नाही. यातून गत पाच महिन्यांत केवळ १७५० वीज जोडण्या करण्यात आल्या. अद्यापही ११ हजार ५०६ वीज जोडण्या प्रलंबित असल्याचे वीज कंपनीने स्पष्ट केले आहे.
यासोबतच कृषिपंप आणि गाव फिडरवर विजेचे असंख्य प्रश्न कायम आहेत. नवीन डीपी, ट्रान्सफार्मर, फ्यूज आणि इतर प्रश्न आजही कायम आहे. विजेचे पोल, अतिरिक्त वीज केंद्रांची आवश्यकता आहे. वीज पुरविण्यासाठी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहे. यासोबतच वीज जोडण्याही क रण्यात येत आहे. इन्फ्रा १, इन्फ्रा २ आणि विदर्भ पॅकेजमधून जिल्ह्यातील कृषिपंपाच्या वीज जोडणीचा प्रश्न सोडविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे नियोजन वीज वितरण कंपनीने तयार केले आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासोबत विविध अडचणी सोडविण्यासाठी वेळ लागणार आहे. यामुळे ११ हजार ५०६ कृषिपंपांच्या वीज जोडण्या पूर्णत्वास जाण्यास विलंब लागणार आहे.
(शहर वार्ताहर)

Web Title: 11 thousand agricultural connections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.