पालकमंत्र्यांसह ११ जण निर्दोष मुक्त
By Admin | Updated: June 19, 2016 02:17 IST2016-06-19T02:17:45+5:302016-06-19T02:17:45+5:30
काँग्रेस कमिटीचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या वाहनावर दगडफेक आणि चालकास मारहाण प्रकरणी पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह ११ जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

पालकमंत्र्यांसह ११ जण निर्दोष मुक्त
नेर न्यायालय : प्रदेशाध्यक्षांच्या वाहनांवर दगडफेकप्रकरण
नेर : काँग्रेस कमिटीचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या वाहनावर दगडफेक आणि चालकास मारहाण प्रकरणी पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह ११ जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी संदीप सरोदे यांनी हा निर्णय दिला आहे.
सन २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत वटफळी गटातून राहुल माणिकराव ठाकरे रिंगणात होते. त्यांच्या प्रचारासाठी काँग्रेस कमिटीचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, तत्कालिन पालकमंत्री नितीन राऊत दाखल झाले होते. आचारसंहिता भंग करून प्रचार केल्याचा आरोप करत त्यांच्या वाहनावर दगडफेक करून चालक मधुकर राठोड याला मारहाण केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पालकमंत्री संजय राठोड, नितीन माकोडे, भाऊराव ढवळे, संजय दारव्हटकर, स्रेहल भाकरे, राजेश ढोकणे, खुशाल मिसाळ, प्रशांत मासाळ, प्रमोद राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर प्रकरण पोलिसांनी न्यायप्रविष्ठ केले. चार वर्ष चार महिने या प्रकरणाचा खटला चालला. २२ साक्षी तपासण्यात आल्या. दोन्ही बाजुच्या युक्तीवादाअंती न्यायालयाने ना. संजय राठोड यांच्यासह ११ जणांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात ना. राठोड यांच्यावतीने अॅड़ रमेश जुनघरे यांनी बाजू मांडली. (तालुका प्रतिनिधी)