१०३ उमेदवारांचा फैसला
By Admin | Updated: October 18, 2014 23:00 IST2014-10-18T23:00:29+5:302014-10-18T23:00:29+5:30
जिल्ह्यातील विधानसभेच्या सात जागांसाठी १०३ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला रविवारी १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सकाळी ८ वाजतापासून सातही मतदारसंघात मतमोजणीला

१०३ उमेदवारांचा फैसला
सात मतदारसंघ : ८ वाजतापासून मतमोजणी, १२ पर्यंत निकाल
यवतमाळ : जिल्ह्यातील विधानसभेच्या सात जागांसाठी १०३ उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला रविवारी १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सकाळी ८ वाजतापासून सातही मतदारसंघात मतमोजणीला प्रारंभ होणार असून दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे.
सात विधानसभा मतदारसंघासाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात सरासरी ६६ टक्के मतदान झाले. शिवाजीराव मोघे, मनोहरराव नाईक, वसंत पुरके, संदीप बाजोरिया, संजय राठोड, वामनराव कासावार, विजय खडसे, मदन येरावार, प्रकाश पाटील देवसरकर, विश्वास नांदेकर, संदीप धुर्वे आदी आजी-माजी आमदारांसह १०३ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद झाले होते. या भाग्याचा फैसला रविवारी होतो आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी धामणगाव रोड स्थित निवासी महिला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय होत आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारी केली आहे. पोलिसांनीही सुरक्षेच्या दृष्टीने व्यापक व्यूहरचना तयार केली आहे. यवतमाळचा नवा आमदार हा काँग्रेसचा होणार, भाजपाचा, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा की बहुजन समाज पार्टीचा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपा, शिवसेना आणि बसपा उमेदवार व समर्थकांमध्ये विजयाचा आत्मविश्वास पहायला मिळत आहे. त्यांनी विजयाच्या जल्लोषाची तयारीही केल्याचे सांगितले जाते.
१५ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघासाठी मतदान घेण्यात आले होते. मतदानाची पक्रिया आटोपल्यानंतर मतमोजणीच्या ठिकाणी स्ट्रॉंगरूममध्ये मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आल्या आहे. या मतपेट्या १९ आॅक्टोबर रोजी उघडल्या जातील. यवतमाळसाठी मतमोजणीचे एकूण २० राऊंड होणार असून प्रत्येक राऊंडमध्ये २० टेबल म्हणजे २० मशिनची मोजणी होईल. वणी मतदारसंघासाठी मतमोजणी वणी येथे शासकीय धान्य गोदामातील दोन नंबरच्या हॉलमध्ये होणार आहे. या मतदारसंघात मजमोजणीचे २३ राऊंड होणार असून प्रत्येक राऊंडमध्ये १४ मशिन राहतील. राळेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे गोडाऊन वडकी रोड, हॉल नंबर दोन येथे होईल. या मतदारसंघासाठी मतमोजणी २५ राऊंड व प्रत्येक राऊंडमध्ये १४ टेबल या प्रमाणे होईल.
दिग्रस येथे नेर रोडला शासकीय धान्य गोदाम हॉल नंबर दोनला मतमोजणी होईल. एकूण २५ राऊंड होणार असून येथेही प्रत्येक राऊंडला १५ मशिन ठेवल्या जातील. आर्णी मतदारसंघासाठी शहीद नागेश्वर जिड्डेवार भवन पांढरकवडा येथे मतमोजणी होणार असून येथेही १५ राऊंड व प्रती राऊंड १४ मशिन राहतील.
पुसद मतदारसंघासाठी तालुका क्रीडा संकुलात मजमोजणी होईल. तेथे २२ राऊंड होणार असून प्रत्येक राऊंडमध्ये १४ मशिन राहतील. उमरखेडसाठी तहसील कार्यालय परिसरातील धान्य गोदामात मतमोजणी होणार आहे. २३ राऊंड होणार असून प्रत्येक राऊंडमध्ये १४ टेबल राहणार आहे. (शहर वार्ताहर)