वीज महावितरण अभियंत्यांची १००२ पदे सक्तीने रिक्त ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:44 IST2020-08-19T14:42:10+5:302020-08-19T14:44:32+5:30
महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने यंदाचे बदली विषयक धोरण ७ ऑगस्टला निश्चित केले आहे. त्यात वीज अभियंत्यांच्या राज्यातील एक हजार दोन जागा सक्तीने रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.

वीज महावितरण अभियंत्यांची १००२ पदे सक्तीने रिक्त ठेवणार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने यंदाचे बदली विषयक धोरण ७ ऑगस्टला निश्चित केले आहे. त्यात वीज अभियंत्यांच्या राज्यातील एक हजार दोन जागा सक्तीने रिक्त ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.
नव्या बदली विषयक धोरणात प्रशासकीय विनंती बदल्यांची टक्केवारी १५ एवढी मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्वे जारी केली गेली. सध्या वेगवेगळ्या संवर्गातील जी पदे रिक्त आहेत ती पुढेही रिक्त ठेवण्याचे धोरण ठरविले गेले आहे. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व समकक्ष रिक्त पदांबाबतचा निर्णय मुंबई मुख्यालयात घेतला जाईल. इतर अतिरिक्त कार्यकारी अभियंते, समकक्ष व त्याखालील पदांचा निर्णय मुख्य कार्यालय घेणार नाही. तर प्रदेशांतर्गत पदांचा निर्णय क्षेत्रीय संचालक घेणार आहेत.
सध्या अभियंत्यांची एक हजार दोन पदे रिक्त असल्याचे जाहीर करण्यात आले असून ती भरली जाणार नाहीत, असेही स्पष्ट केले गेले. त्यामध्ये मुख्य अभियंता दोन, अधीक्षक अभियंता नऊ, कार्यकारी अभियंता २५, अतिरिक्त कार्यकारी अभियंता ७४, उपकार्यकारी अभियंता १००, सहायक अभियंता ३२९ व कनिष्ठ अभियंत्यांच्या ४६३ पदांंचा समावेश आहे. ही पदे पुढेही रिक्त ठेवली जाणार असल्याने उपलब्ध अभियंत्यांवर कामांचा ताण वाढणार असून ग्राहकांना अखंडित सेवा देण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. १८ ऑगस्ट २०२० ला निर्माण करण्यात आलेली ट्रान्सफॉर्मेशन टेक्नॉलॉजी, वित्त व मानव संसाधन या संवर्गातील रिक्त पदे न भरण्याचा निर्णयही घेतला गेला आहे.
कर्मचारी कमी करण्याचा घाट
मनुष्यबळ संरचनेसाठी काही वर्षापूर्वी समिती गठित करण्यात आली होती. त्यांनी सूचविलेली संरचना स्वीकारून अमलात आणली गेली. आता मात्र त्यामध्ये एकतर्फी बदल करून कर्मचारी कमी करण्याचा घाट घातला गेल्याचा सूर उमटत आहे.
फ्रॅन्चायझी क्षेत्रातील यंत्रणेचाही विचार
शिळ, मुंब्रा, कळवा, मालेगाव हे क्षेत्र फ्रॅन्चायझीला हस्तांतरित केल्याने तेथील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे योग्य समायोजन करण्याचे नव्या बदली विषयक धोरणात ठरविण्यात आले. नागपूर शहर मंडळात फ्रॅन्चायझी सुरू झाली तेव्हा या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बाहेर पाठविले गेले त्यांच्याबाबत विचार करण्याचे ठरले. सर्व बदल्या आता मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे.
बदली धोरण ठरविताना कोणत्याही संघटनेला विश्वासात घेतले गेले नाहीत, असे सांगत काहींनी या बदली धोरणाला छुपा विरोध दर्शविला आहे.
यंदाचे बदली धोरण ठरविताना संघटनांना विश्वासात घेतले गेले नसले तरी त्यात पारदर्शकता दिसून येते. विविध संवर्गाची २५ हजार पदे महावितरणमध्ये रिक्त आहेत. यंदा बदल्या करताना त्यात आणखी वाढ होऊ नये, फिल्डवरची पदे तातडीने भरली जावी, त्यामुळे ग्राहकांना सेवा देताना अडचणी येणार नाही.
- कृष्णा भोयर, सरचिटणीस एमएसईबी वर्कर्स फेडरेशन, मुंबई.