पुसदच्या रस्त्यावर शंभर फूट अतिक्रमण

By Admin | Updated: March 1, 2017 01:26 IST2017-03-01T01:26:51+5:302017-03-01T01:26:51+5:30

शहराच्या वैभवात भर घालणारे नगर परिषदेचे सुसज्ज भाजी मार्केट ओस पडले असून अगदी वर्दळीच्या रस्त्यावर शहराचा भाजीबाजार भरतो.

100 feet encroachment on Pusad's road | पुसदच्या रस्त्यावर शंभर फूट अतिक्रमण

पुसदच्या रस्त्यावर शंभर फूट अतिक्रमण

गांधी चौक ते आंबेडकर मार्गावर भाजीबाजार : १२० फुटांचा रस्ता उरला केवळ २० फूट
पुसद : शहराच्या वैभवात भर घालणारे नगर परिषदेचे सुसज्ज भाजी मार्केट ओस पडले असून अगदी वर्दळीच्या रस्त्यावर शहराचा भाजीबाजार भरतो. या भाजीबाजाराच्या अतिक्रमणाने पुसद शहरातील गांधी चौक ते डॉ. आंबेडकर चौक हा १२० फुटांचा रस्ता आता अवघा २० फुटांचा झाला. हातगाड्यांच्या गर्दीने दुचाकी जायला जागा नसलेल्या या ठिकाणी दिवसभर ग्राहकांची गर्दी आणि विक्रेत्यांचा गोंगाट सुरू असतो. परिणामी या मार्गावर असलेले गाळेधारक व्यावसायिक कमालीचे त्रस्त आहेत.
पुसद शहरातील महात्मा गांधी चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावर वर्षानुवर्षे भाजीबाजार भरतो. या ठिकाणी विक्रेते हातगाडी लावून सकाळपासून रात्रीपर्यंत व्यवसाय करतात. भाजी, फळे, स्टेशनरी यासह विविध हातगाडे अगदी रस्त्यावर लावले जातात. विक्रेत्यांची येथे एवढी गर्दी झाली आहे की, पाय ठेवायला जागा नसते. सायंकाळच्या वेळी तर शहरातील नागरिकांची भाजी खरेदीसाठी वर्दळ असते. विक्रेत्यांचा गोंगाट आणि वाहनांचा हॉर्न असा कलकलाट येथे सुरू असतो. विशेष म्हणजे, हा रस्ता शहरातील सर्वांत मोठा रस्ता आहे. विश्वनाथसिंह बयास नगराध्यक्ष असताना त्यांनी हा १२० फुटांचा रस्ता तयार केला होता. चौपदरी रस्त्याच्या मधोमध शोभेसाठी पामची झाडे लावली. रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी संकुल उभारले आहे. परंतु या दुकानासमोरील संपूर्ण रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी ताबा घेतला आहे. एकामागे एक अशी पाच ते सहा हातगाड्यांची लाईनमध्ये असंख्य हातगाड्या येथे लागलेल्या असतात. त्यामुळे या व्यावसायिक संकुलात जाण्यासाठी ग्राहकांना रस्ता शोधावा लागतो. मोठे वाहन तर सोडा दुचाकी कुठे उभी करायची, असा प्रश्न असतो. येथील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर याचा मोठा परिणाम होत आहे.
या रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्याचा नगर परिषदेने अनेकदा प्रयत्न केला परंतु त्यात यश आले नाही. दोन वर्षांपूर्वी या विक्रेत्यांना आठवडीबाजारातील खुली जागा उपलब्ध करून दिली होती. रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना या ठिकाणी बसविण्यात आले. महिना दोन महिने त्यांनी तेथे व्यवसायही थाटला परंतु ग्राहक येत नसल्याचे कारण पुढे करून व्यावसायिक पुन्हा आपल्या जुन्याच ठिकाणी आले. त्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नगर परिषदेने आठवडीबाजारातच सुसज्ज भाजी मार्केट बांधले. त्यासाठी सुमारे ९० लाख रुपये खर्च करण्यात आला. या ठिकाणी व्यावसायिकांसाठी वीज, पाणी आदी सर्व व्यवस्था उपलब्ध करून दिली. परंतु आजही हे भाजी मार्केट ओस पडले आहे. नगरपरिषद या भाजी मार्केटमधील गाळ्यांचा लिलाव करून ते विक्रेत्यांना देणार आहे. साधारणत: मार्च महिन्यापर्यंत लिलाव होणे अपेक्षित आहे. यानंतर गांधी चौक ते डॉ.आंबेडकर चौक हा परिसरात मोकळा होणार असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर या परिसरात अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी नगरपरिषदेसोबतच वाहतूक पोलिसांची आहे. मात्र सध्या या विकेत्यांना येथून भाजी मार्केटमध्ये बसविण्याचे दिव्य नगरपरिषदेला पार पाडावे लागणार आहे. (कार्यालय चमू)

Web Title: 100 feet encroachment on Pusad's road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.