१० लाखांची धाडसी घरफोडी

By Admin | Updated: July 27, 2015 01:14 IST2015-07-27T01:14:53+5:302015-07-27T01:14:53+5:30

शहरातील सर्वात सुरक्षित वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधुबन कॉलनीत धाडसी घरफोडी होऊन

10 lakh brazen burglars | १० लाखांची धाडसी घरफोडी

१० लाखांची धाडसी घरफोडी

मधुबन कॉलनीतील घटना : ३५६ ग्रॅम सोन्यासह रोख लंपास
यवतमाळ : शहरातील सर्वात सुरक्षित वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधुबन कॉलनीत धाडसी घरफोडी होऊन चोरट्यांनी तब्बल दहा लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ ते रात्री १० च्या दरम्यान घडली.
येथील धामणगाव मार्गावरील मधुबन कॉलनीत जयकिसन धूत यांचे घर आहे. शनिवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे मेनलाईन स्थित आपल्या दुकानात गेले होते. तर पत्नी बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी हात साफ केला. लगतच्या मोकळ्या मैदानातून थेट वॉलकंपाऊंडवरून घराच्या आवारात चोरट्यांनी प्रवेश केला. मुख्यदाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील तळ मजल्यातील दोन कपाट आणि वरच्या मजल्यातील दोन कपाट या चोरट्यांनी फोडले. कपाटातून ३६५ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदी, डायमंड ज्वेलरी, रोख एक लाख पाच हजार असा ऐवज लंपास केला. रात्री १० वाजता जयकिसन धूत आपल्या घरी परतले तेव्हा दाराचे कुलूप तुटलेले आढळले. दार उघडण्याचा प्रयत्न केला असता ते आतून बंद होते. संशय बळावल्याने त्यांनी परिसरातील नागरिकांना माहिती दिली. चोरटे घरामागून शिरले आणि तेथूनच पसार झाल्याचा संशय आहे.
या घटनेची माहिती यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मधुबन कॉलनी ही शहरातील सर्वात सुरक्षित कॉलनी म्हणून ओळखली जाते. या कॉलनीला चारही बाजूला सुरक्षा भिंत असून एकच प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारावर २४ तास चौकीदार तैनात असतो. अशा स्थितीतही चोरट्याने या कॉलनीत शिरुन तेही सायंकाळच्या सुमारास चोरी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील घरफोडीचा अजूनही उलगडा झालेला नसतानाच चोरट्यांनी आणखी एक आव्हान पोलिसांपुढे उभे केले आहे. शहरात दररोज कुठे ना कुठे घरफोडी होत असून पोलीस मात्र चोरट्यांना जेरबंद करण्यात अपयशी ठरले आहे. रविवारी सायंकाळी धूत यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 10 lakh brazen burglars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.