चिंता वाढली.. यवतमाळमध्ये कोरोनाचे १० रुग्ण आढळले
By विशाल सोनटक्के | Updated: April 4, 2023 14:27 IST2023-04-04T14:24:48+5:302023-04-04T14:27:10+5:30
आठ महिला आणि दोन पुरुष रुग्णांचा समावेश

चिंता वाढली.. यवतमाळमध्ये कोरोनाचे १० रुग्ण आढळले
यवतमाळ : कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढते की काय अशी चिंता सतावू लागली आहे. रविवारी कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी आणखी दहा रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या १२ झाली आहे.
मागील पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मागील आठवड्यात यवतमाळ येथील एकाचा अहवाल बाहेर जिल्ह्यात पाॅझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर रविवारी दोन रुग्णांची भर पडली. मंगळवारी कोरोनाच्या ४१९ नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यातील दहा अहवाल पाॅझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये आठ महिला आणि दोन पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
बाभूळगाव आणि नेर तालुक्यात प्रत्येकी तीन तर यवतमाळ आणि दिग्रस तालुक्यातील प्रत्येकी दोन रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आजवर ७९७७६ कोरोना बाधित निष्पन्न झालेले असून त्यातील ७७९७० जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर १८०४ जणांचा या आजारामुळे आजवर मृत्यू झाला आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.