एसटी-दुचाकी अपघातात १ ठार, १७ जण जखमी
By Admin | Updated: May 12, 2016 02:38 IST2016-05-12T02:38:41+5:302016-05-12T02:38:41+5:30
समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस झाडावर जाऊन आदळल्याने दुचाकीस्वार ठार तर बसमधील वाहकासह १७ प्रवासी जखमी झाले.

एसटी-दुचाकी अपघातात १ ठार, १७ जण जखमी
थाळेगावची घटना : दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात झाला अपघात
बाभूळगाव : समोरुन येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस झाडावर जाऊन आदळल्याने दुचाकीस्वार ठार तर बसमधील वाहकासह १७ प्रवासी जखमी झाले. ही घटना यवतमाळ-धामणगाव मार्गावरील थाळेगाव फाट्याजवळ बुधवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली. जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दीपक माधव सुकटे (३०) रा. खापरी ता. घाटंजी असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातात एसटीची वाहक संघमित्रा जितेंद्र मोहोड (३०) रा. ब्राम्हणवाडा, दुचाकीस्वार गजानन तानबा कडू (३०) रा. खापरी ता. घाटंजी, गोविंद शाहाकार, सुमित्राबाई थूल, संजय वंजारी, गिरजाबाई झामरे, चंदू हसन रायलीवाले, हुसेन कासम रायलीवाले, विठाबाई भाऊराव दाढे, सुभद्राबाई चौधरी, बाबाराव वंजारी, निलेश वाईकर, नीता कोठेकर, चंद्रकला बानोरे, जिजाबाई घायवन, महादेव खरबकार, पोलीस शिपाई योगिता शिबाळे, गिरजाबाई तेलंग जखमी झाले. राज्य परिवहन महामंडळाची बस (एम.एच-४०-८२२९) यवतमाळवरून धामणगावकडे बुधवारी दुपारी जात होती. थाळेगाव फाट्याजवळ समोरुन भरधाव दुचाकी आली. या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. यामुळे वाहकाच्या बाजूला एसटीला मोठ्या प्रमाणात क्षती झाली. तसेच आतील प्रवासी जखमी झाले. अपघाताचे वृत्त कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून तत्काळ यवतमाळच्या व बाभूळगावच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी एसटी झाडावर आदळली. तो दुचाकीस्वार मात्र या अपघातात ठार झाला. सर्व जखमींना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)