जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच जागेवर वंचित बहुजन आघाडी व जिल्हा जनविकास आघाडीची अधिकृत घोषणा वाशिम येथे विदाता येथे आयोजित पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवान फुंडकर, जिल्हा जनविकास आघाडीचे नेते ॲड. नकुलदादा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष गजाननराव लाटे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख, जिल्हा परिषदेचे जन विकासचे गटनेते स्वप्नील सरनाईक, वंचित आघाडीचे महासचिव सिद्धार्थ देवरे, प्रदेश सदस्य किरणताई गिर्हे, जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव शिंदे, रिसोड पंचायत समिती सभापती सुभाषराव खरात यांच्यासह वंचित बहुजन आघाडी व जिल्हा जनविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते.
.................
जिल्हा परिषद, पंचायत समिती जागा वाटप
जिल्ह्यात हाेऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीकरिता भरजहाॅंगीर, पांगरी, माेप, महागाव, जऊळका, जाेडगव्हाण, शिरपूर, मारसुळ निवडणूक वंचित बहुजन विकास आघाडी लढेल तर गाेभणी, कवठा, कवठा (पं.स.), हराळ, खंडाळा येथील जागेवर जनविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक लढणार असल्याची घाेषणा करण्यात आली. तर वाकद येथे मैत्रीपूर्ण लढत हाेणार आहे.
..................
वंचित, बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी ही युती : नकुल देशमुख
दाेन्ही नेत्यांच्या आदेशाने आज ही घाेषणा करण्यात आली आहे. ही युती जी आहे ही वंचितांची युती आहे. वंचित बहुजन विकास आघाडी असाे वा बहुजन जनविकास आघाडी असाे या नेहमी वंचित, बहुजनांसाठीच काम करीत आली आहे. वंचित, बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी ही युती करण्यात आली असल्याचे बहुजन जनविकास आघाडीचे ॲॅड. नकुल देशमुख यांनी यावेळी सांगितले.
.....................
जिल्हा विकासाकरिता युती : धैर्यवान फुंडकर
जिल्ह्याच्या विकासाकरिता जिल्हा परिषद काम करीत असून पाहिजे त्या प्रमाणात अजूनही जिल्ह्याचा विकास झाला नाही. जिल्ह्याचा विकास व्हावा, लाेककल्याणकारी याेजना राबिवण्यात याव्यात याकरिता सक्षम असे एक प्लॅटफार्म लाेकांपुढे ठेवावे यासाठी लाेकनेते ॲॅड. बाळासाहेब आंबेडकर, अनंतराव देशमुख यांच्यामध्ये चर्चा झाली व समन्वयाने ही युती करण्यात आली. असे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवान फुंडकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेस उशीर झाल्यामुळे पत्रकारांसमाेर दिलगिरीही व्यक्त केली.
........................
पत्रकार परिषदेमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भरणा
जिल्हा परिषद पाेटनिवडणुकीत युती झाल्याची माहिती देण्याच्या उद्देशाने आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडी व जिल्हा महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचाच भरणा जास्त दिसून आला. विशेष म्हणजे युती झाल्यानंतर घाेषणाही देण्यात आल्या.