संतोष वानखडे
वाशिम : वाशिम येथे बोगस डॉक्टरकडून अवैध गर्भपाताचा प्रयत्न झाल्याने, बोगस डॉक्टरांची शोध मोहीम सक्रिय होणे अपेक्षीत आहे. तालुकानिहाय समित्यांचे कार्य थंडावल्याने शहरासह ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचे पीक चांगलेच बहरत आहे.
वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरातील एका दवाखान्यात विलास ठाकरे नामक बोगस डॉक्टरकडून अवैध गर्भपाताचा प्रयत्न झाल्याने आरोग्य क्षेत्र ढवळून निघाले. अधिकृत डॉक्टरकडे कंपाैंडर म्हणून काही वर्षे सेवा दिल्यानंतर, या अनुभवाच्या जोरावर अनेक जण ग्रामीण भागात दवाखाना थाटतात. शहरी भागातही काहीजण बोगस पदवी दाखवून रुग्णांवर उपचार करतात. तीन महिन्यांपूर्वी कारंजा शहरातील अशाच एका बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल झालेला आहे. अवैध गर्भपाताच्या प्रकरणाने बोगस डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, याप्रकरणी ठोस कार्यवाही होणे अपेक्षित आहे. बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीदेखील स्थापन करण्यात आलेली आहे. मात्र, केवळ एका कारवाईचा अपवादवगळता या समितीने गत पाच महिन्यांत एकावरही कारवाई केली नाही. कारवाईची मोहीम थंडावल्याने ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचे पीक चांगलेच बहरत आहे. बोगस डॉक्टरकडून उपचार होत असल्याने रुग्णांचा जीवही धोक्यात सापडत आहे. बोगस डॉक्टरकडून उपचारादरम्यान रुग्णाचा जीव धोक्यात सापडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रुग्णांवर सुरक्षित उपचार होण्यासाठी बोगस डॉक्टरांची शोधमोहीम सक्रिय होणे आवश्यक ठरत आहे.
००००००
‘तो’ दवाखाना बंद आढळला!
कारंजा व मानोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचार होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच, त्याची दखल घेत आरोग्य विभागाने २५ ऑगस्टला मोहरी येथील दवाखान्यांची झाडाझडती घेतली. संबंधित दवाखाने बंद असल्याने चमूला खाली हात परतावे लागले. दवाखाना बंद आढळल्याने उलटसुलट चर्चेला ऊत येत आहे. संबंधित डॉक्टरकडे अधिकृत वैद्यकीय पदवी असेल तर दवाखाना बंद का ठेवला? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी वैद्यकीय पदवीची पडताळणी होणे गरजेचे ठरत आहे.
००००००
तालुकास्तरीय समित्यांकडून केवळ एक कारवाई!
जिल्ह्यात सहा तालुकास्तरीय समित्यांचे गठण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी सहा महिन्यांपूर्वी दिले होते. त्यानुसार तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. केवळ कारंजाच्या समितीने एका बोगस डॉक्टरवर कारवाई केली. उर्वरित समित्यांनी बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
०००००००००००००
कोट बॉक्स
जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याबाबत तालुकास्तरीय यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. बुधवारी मोहरी येथील एका दवाखान्याची तपासणी करण्यासाठी चमूला पाठविण्यात आले होते. मात्र, दवाखाना बंद असल्याने अधिक तपशील मिळू शकला नाही. बोगस डॉक्टरप्रकरणी निश्चितच कारवाईच्या मोहिमेला गती देण्यात येईल.
- डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम
००००००००००००००
जिल्ह्यातील एकूण अधिकृत रुग्णालये २१०
आठ महिन्यांत बोगस डॉक्टर कारवाई १