वाशिम तालुक्यातील सुरकंडी बु. गावाशी जोडणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्था झालेली आहे. रस्त्याला खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ते, हेच यामुळे कळेनासे झाले आहेत. शहरातील हिंगोली रेल्वे गेट पासून सुरकंडी बु. पर्यंतचा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा ; अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला. निवेदन देतेवेळी मनविसेचे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, राजू किडसे, अमोल गाभणे, अमोल मुळे, रवी वानखेडे, अशोक नाईकवाडे, फकिरा कर्डिले उपस्थित होते.
.....................
खड्ड्यांमध्ये फसताहेत दुचाकी, चारचाकी वाहने
वाशिम-सुरकंडी बु. या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेष गंभीर बाब म्हणजे या रस्त्याने धावणारी दुचाकी, चारचाकी वाहने पूर्णतः सामावतील, इतक्या मोठ्या आकाराच्या काही खड्ड्यांचा त्यात समावेश आहे. संबंधित यंत्रणेने रस्त्याच्या दुरूस्तीचे काम तत्काळ हाती घेऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.
...................
कोट :
वाशिम शहरातून सुरकंडीकडे जाणारा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. रस्त्याची गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्था झाली असताना त्याकडे लक्ष द्यायला कुणी तयार नाही. रस्ता डागडुजी किंवा नूतनीकरणाचे काम तत्काळ हाती न घेतल्यास मनविसे कडून आंदोलन छेडले जाईल.
- नितीन शिवलकर, जिल्हाध्यक्ष, मनविसे, वाशिम