वाशिम : कोरोनाकाळात २.२५ लाख गोरगरिबांना मोफत अन्नधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 11:22 AM2021-05-11T11:22:31+5:302021-05-11T11:22:37+5:30

Washim News : जिल्ह्यातील २.२५ लाख लाभार्थींसाठी ५० हजार क्विंटल धान्य टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहे.

Washim: Free foodgrains to 2.25 lakh poor during Corona period | वाशिम : कोरोनाकाळात २.२५ लाख गोरगरिबांना मोफत अन्नधान्य

वाशिम : कोरोनाकाळात २.२५ लाख गोरगरिबांना मोफत अन्नधान्य

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाकाळात गोरगरिबांची गैरसोय होऊ नये याकरिता केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या दोन महिन्यांसाठी रेशनचे मोफत धान्य वितरित केले जाणार आहे. जिल्ह्यातील २.२५ लाख लाभार्थींसाठी ५० हजार क्विंटल धान्य टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहे.
गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. गतवर्षी संपूर्ण लॉकडाऊन असल्याने केंद्र शासनाने तीन महिन्यांच्या कालावधीसाठी अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना रेशनचे मोफत धान्य वितरित केले होते. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. एप्रिल महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्याने गोरगरीब लाभार्थींची गैरसोय होऊ नये म्हणून राज्य शासनाने एका महिन्यासाठी मोफत धान्य देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून सुरू केली. याच धर्तीवर केंद्र शासनातर्फेदेखील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंबांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी एक किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. 
या योजनेंतर्गत २ लाख २५ हजार ९२० कार्डधारकांना ४९ हजार ५०० क्विंटल धान्य उपलब्ध केले जाणार आहे.  रेशन दुकानांमधून धान्य वाटप करताना गर्दी होऊ नये म्हणून दुकानदारांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना पुरवठा विभागाने दिलेल्या आहेत.


मोफत धान्यासाठी लाभार्थींचा अंगठा नाही 
कोरोनाकाळात ऑनलाइन पद्धतीने रेशनचे धान्य वितरित झाले तर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन महिने ‘ई-पॉस’वर केवळ संबंधित दुकानदाराचा अंगठा घेऊन लाभार्थींना धान्य वाटप केले जाणार आहे, असे जिल्हा पुरवठा विभागाने स्पष्ट केले.


जिल्ह्यात ७७६ रेशन दुकाने असून, यापैकी १२ दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. केंद्र शासनातर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मे, जून या दोन महिन्यांसाठी रेशनचे मोफत धान्य वितरित केले जाणार आहे. 
- सुनील विंचनकर
जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम

Web Title: Washim: Free foodgrains to 2.25 lakh poor during Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम