वाशिम: आता नवीन तूर विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये येत आहे तर दुसरीकडे किमान आधारभूत किंमतीपेक्षा तब्बल एक हजार रुपयाने कमी दर मिळत असल्याने शेतक-यांच्या अडचणींत भर पडत आहे. शुक्रवारी बाजार समित्यांमध्ये तूरीला ३८०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. वाशिम जिल्ह्यात सन २०१७ मध्ये ५० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात तुरीची पेरणी झाली होती. वातावरणात वेळोवेळी झालेल्या विपरित बदलांमुळे या पिकाला आधीच फटका बसला. अपुरा पाऊस, ढगाळ वातावरणामुळे परिणाम होऊन या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. विविध संकटातून वाचलेले तूर पीक आता शेतक-यांच्या घरात येत आहे. ऊसणवारीचे व अन्य आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना तूर विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. नवीन तूर बाजारात येताच, तूरीचे दर अपेक्षेपेक्षाही खाली घसरले आहेत. मध्यम प्रतीच्या तूरीला ३९०० ते ४१०० या दरम्यान प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. यामधून तूरीचा लागवड खर्चही वसूल होणार नसल्याचा दावा शेतक-यांनी केला. केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत प्रती क्विंटल ५ हजार ४५० रुपये निश्चित केली आहे. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ३८०० ते ४५०० रुपयादरम्यान तूरीला दर मिळत असल्याचे दिसून येते. हमीभावापेक्षा तब्बल एक हजार रुपये कमी दर मिळत असल्याने शेतक-यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. हमीभावाने तूरीची खरेदी व्हावी, अशी मागणी प्रगतशील शेतकरी महादेव सोळंके यांनी केली.
वाशिम: शेतकरी अडचणीत : नवीन तूर बाजारात; हमीभावापेक्षा हजार रुपयाने कमी दर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 18:01 IST