लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना पॉझिटिव्हिटी दर व ऑक्सिजनच्या बेडवरील रुग्णसंख्येच्या धर्तीवर राज्य शासनाने पाचस्तरीय ‘अनलॉक’ पद्धत अंमलात आणली आहे. दरम्यान, जिल्ह्याचा सध्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.२५ टक्के असून, ९.१ टक्के बेड ‘ऑक्सिजन’वरील रुग्णांनी व्यापलेले आहेत. त्यानुसार, जिल्ह्याचा समावेश पहिल्या टप्प्यात झाला आहे. त्यामुळे १४ जूनपासून संपूर्ण जिल्हा ‘अनलॉक’ होणार असून, सध्या असलेले निर्बंध पूर्णत: हटविले जाणार आहेत.कोरोना विषाणू संसर्गाच्या संकट काळात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध राज्याच्या मुख्य सचिवांच्या आदेशावरून ७ जून २०२१ पासून टप्प्याटप्प्याने हटविण्यात आले आहेत. ‘अनलॉक’बाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, चालू आठवड्यात जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.२५ टक्के असून, रुग्णांनी ऑक्सिजन बेड व्यापल्याची टक्केवारी ९.१ इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्याचा समावेश पहिल्या स्तरात झालेला आहे. त्यामुळे येत्या सोमवार, १४ जूनपासून सर्व दुकाने पूर्णवेळ खुली ठेवण्यास मुभा असणार आहे. यासह सिनेमागृहे, नाट्यगृहे, माॅल ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम कोरोनाविषयक नियमांचे पालन करून ५० टक्के क्षमतेने आयोजित करता येऊ शकतील. खेळांची मैदाने खुली करण्यात आली आहेत; मात्र पुढील आदेशापर्यंत कुठल्याही क्रीडा स्पर्धेचे आयोजन करता येणार नाही. मंगल कार्यालय, लाॅन आदिठिकाणी लग्न समारंभ आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली आहे; परंतु नियमांचे पालन करून ५० व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी असणार आहे. अंत्ययात्रेत २० व्यक्तींना उपस्थित राहता येईल.जीम, सलून, ब्युटीपार्लर नियमित सुरू राहतील; नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.जमावबंदी, संचारबंदी हटविली जाणारजिल्ह्यात १४ जूनपासून जमावबंदी, संचारबंदी पूर्णत: हटविली जाणार आहे; परंतु प्रत्येक बाबीसाठी लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध कायम राहतील. नागरिकांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे; अन्यथा प्रशासनाकडून स्थापन केल्या जाणाऱ्या विविध पथकांमार्फत दंडाची आकारणी व अनुषंगिक कारवाई करण्यात येईल.
मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंडयेत्या १४ जूनपासून संपूर्ण जिल्हा ‘अनलाॅक’ होणार असला तरी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक करण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्तीने योग्य पद्धतीने मास्कचा वापर न केल्यास ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.
काय सुरू राहिल ? अत्यावश्यक सेवेची असलेली व नसलेली सर्व दुकाने आठवड्यातील पूर्ण दिवस सुरू राहतील. हॉटेल्स, सलून, पार्लर पूर्ण क्षमतेने खुली राहतील.सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सुरू राहतील. खासगी आणि सरकारी कार्यालयांत १०० टक्के क्षमतेने उपस्थिती राहील.सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना ५० टक्के क्षमतेने (सभागृहाच्या) परवानगी राहील.
शासनाने अंमलात आणलेल्या पाचस्तरीय ‘अनलॉक’च्या सुधारित नियमावलीची जिल्ह्यात अंमलबजावणी केली जात आहे. चालू आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर २.२५ टक्के असून, ९.१ टक्के ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा पहिल्या स्तरात समावेश झाला असून, १४ जूनपासून नियमांचे पालन करण्याच्या अटीवर सर्व बाबी खुल्या करण्यास परवानगी देण्यात येत आहे.- शण्मुगराजन एस.,जिल्हाधिकारी, वाशिम