कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन; दुकानदारांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 10:29 AM2021-05-10T10:29:15+5:302021-05-10T10:29:43+5:30

Washim News : १० दुकाने सील करून दुकानदारांकडून ३० हजाराचा दंड वसूल केला.

Violation of corona rules; Fines to shopkeepers | कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन; दुकानदारांना दंड

कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन; दुकानदारांना दंड

Next

कारंजा (लाड) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर निर्बंध लावले आहेत. तरीही शहरातील काही व्यापाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन दुकाने उघडून विक्री सुरू ठेवल्यामुळे ८ मे रोजी १० दुकाने सील करून दुकानदारांकडून ३० हजाराचा दंड वसूल केला.
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सर्रास खरेदी-विक्री चालू आहे, ही गंभीर बाब असून याचे पालन होत नसल्याने मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी दुकानांवर कारवाई केली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध जाहीर केले आहे. मेडिकल दुकानाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आली आहे. तर संचारबंदी आदेशाच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनावर टाकली आहे. कारंजा नगरपालिकेचे पथक शनिवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत बाजारपेठेत पाहणी करून कारवाई करण्यासाठी फिरत होते. त्यावेळी नगरपालिका पथकाला बाजारपेठेतील काही दुकाने उघडलेली आढळून आली. तसेच शटर लावून ग्राहकांना आत घेऊन विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी या दुकानदारांवर कारवाई केली. दरम्यान, एकीकडे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात काही दुकानदार हे दुकाने उघडून माल विकत आहे. याला लगाम बसण्यासाठी  धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. याच दरम्यान १० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच कारवाई करून दुकाने सील करण्यात आली आहेत. मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर, विनय वानखडे, राहुल सावंत, सुधीर चौकोर, रवी जयदे, विजय सावंते आदींनी कारवाई केली.


कारवाईची मोहिम तीव्र करणार
कारंजा शहरात यापूर्वीदेखील संचारबंदी असताना दुकाने उघडी असल्याचे आढळून आल्याने संबंधित दुकानदारांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्याऊपरही काही दुकानदार हे चोरून, लपून व्यवसाय करीत असल्याची माहिती नगर परिषदेच्या पथकाला मिळाली हाेती. या माहिती पडताळणी म्हणून पथकाने पाहणी केली असता शनिवारी दुकानांचे अर्धे शटर उघडे आढळून आले तसेच दुकानात व्यवहार सुरू असल्याचे निदर्शनात आल्याने कारवाई करण्यात आली. दुकानदारांनी संचारबंदी नियमाचे पालन करावे, असे आवाहन करतानाच यापुढेही कारवाईची मोहिम तीव्र करणार असल्याचे मुख्याधिकारी डोल्हारकर यांनी सांगितले.

Web Title: Violation of corona rules; Fines to shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.