शिरपूर ग्रामपंचायतची ऑनलाईन ग्रामसभा ३० ऑगस्ट रोजी आयोजित केली होती. शिरपूरची लोकसंख्या लक्षात घेता किमान कोरमसाठी १०० ग्रामस्थांनी ऑनलाईन सहभाग घेणे गरजेचे होते. मात्र केवळ २० ग्रामस्थ ऑनलाईन जोडल्या गेले. त्यामुळे सभा तहकूब करावी लागली. तहकूब केलेली ग्रामसभा ७ सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली. ७ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता नियोजित सभेचा मेसेज व लिंक विविध व्हाॅट्सअप ग्रुपवर टाकण्यात आली. प्रत्यक्षात ही ग्रामसभा साडेबारा वाजता सुरू झाली. या ग्रामसभेमध्ये १८ ते २० जण सहभागी झाले. सभेमध्ये ग्रामसचिव भागवत भुरकाडे यांनी ग्रामपंचायतचे उत्पन्न व खर्च याचे वाचन केले. तसेच २ कोटी ६० लाख रुपये थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरण्याचे आवाहन केले. यानंतर ऑनलाईन ग्रामसभेमध्ये मत व्यक्त करण्यासाठी इच्छुक असलेल्या ग्रामस्थांना चर्चेत सहभागी होईल असे वाटले होते. मात्र ग्राम विकास अधिकारी यांनी नियमावर बोट ठेवून तहकूब झालेल्या सभेमुळे वेळेवर आलेले विषय चर्चेत घेता येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे बऱ्याच जणांचा हिरमोड झाला. शेवटी अध्यक्ष सरपंच राजकन्या आढागळे यांनी ग्रामसभा समाप्तीची घोषणा केली.
-------
कोट: ऑनलाईन ग्रामसभा कुतूहलाचा व थेट चर्चेत सहभागी होण्याचा विषय होता. या सभेत समस्या व विकासात्मक विषय सुचविण्याचा मानस होता. मात्र वेळेवर आलेले विषय चर्चेत घेता येणार नाही असे म्हणून ग्रामसभा समाप्तीची घोषणा केली. त्यामुळे थोडी नाराजी वाटली.
-किशोर देशमुख,
ग्रामस्थ, शिरपूर जैन.