वाशिम जिल्ह्यात पोषण महिना उपक्रमास प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 02:25 PM2019-09-03T14:25:59+5:302019-09-03T14:26:08+5:30

जिल्हाभरात आशा सेविकांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृतीस सुरूवात झाली असून ५ महत्वाच्या घटकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.

Vashim district begins Nutrition Month activities! | वाशिम जिल्ह्यात पोषण महिना उपक्रमास प्रारंभ!

वाशिम जिल्ह्यात पोषण महिना उपक्रमास प्रारंभ!

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्यावतिने राबविण्यात येणाऱ्या राष्टÑीय पोषण महिना उपक्रमास १ सप्टेंबरपासून जिल्ह्यात प्रारंभ झाला. ३० सप्टेंबरपर्यंत चालणाºया या उपक्रमांतर्गत पहिल्याच दिवसापासून जिल्हाभरात आशा सेविकांच्या माध्यमातून प्रभावी जनजागृतीस सुरूवात झाली असून ५ महत्वाच्या घटकांवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी सांगितले, की पोषण अभियानाच्या माध्यमातून नवजात बालकाच्या पहिल्या हजार दिवसात त्याचे पोषण व्यवस्थितरित्या होणे, अ‍ॅनेमिया, अतिसार या आजारांवर नियंत्रण मिळविणे, हात धुणे आणि वैयक्तिक स्वच्छतेवर भर, पौष्टीक आहार यासारख्या ५ महत्वपूर्ण घटकांकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासंबंधी लाभार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता आशा सेविकांची मदत घेतली जात असून शहरी भागातील झोपडपट्टीतील लोकसंख्या व स्थलांतरीत नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यासह पोषण सेवेचा लाभ देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.
पोषण आहार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य व कुटूंब कल्याण, पाणी पुरवठा स्वच्छता विभाग, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, ग्राम विकास, नगर विकास, कृषी, कौशल्य विकास, क्रिडा, माहिती व जनसंपर्क, समाज कल्याण आदी विभागांचा सहभाग घेण्यात आला आहे. या अभियानांतर्गत २ सप्टेंबरपासून गणेशोत्सवातील देखाव्यांमध्ये जनजागृतीपर बॅनर्स लावणे, ३ सप्टेंबरला बालकांचे लसीकरण, ४ सप्टेंबरला पौष्टीक आहारांसबंधी जागर करण्यासाठी प्रभात फेरी, ५ सप्टेंबरला कुपोषित बालकांच्या घरी भेटी देणे, ६ सप्टेंबरला आरोग्य विभाग, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने अ‍ॅनेमिया प्रतिबंधासाठी आरोग्य शिबिर, ७ सप्टेंबरला नाटिका, पथनाट्याच्या माध्यमातून पोषण आहारासंबंधी जनजागृती करणे, ९ सप्टेंबरला वैयक्तिक स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सायकल रॅली, ११ सप्टेंबरला परसबागेबद्दल जनजागृती करणे, १३ सप्टेंबरला लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने पोषण चौपालचे आयोजन करून परिसर स्वच्छता, स्वच्छतागृहांचा वापर, आहाराचे महत्व आणि उपलब्धता आदिंबाबत चर्चा घडवून आणली जाणार आहे.
यासह १४ ते २१ सप्टेंबर या कालावधीत शाळांमध्ये पोषण प्रश्नोत्तरी, पोषणविषयक वादविवाद स्पर्धा घेतली जाणार आहे. तसेच २३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत बचतगटांच्या बैठका घेऊन अ‍ॅनिमिया, योग्य आहार सवयी, वैयक्तिक परिसर स्वच्छता याबाबत जनजागृती केली जाणार असल्याची माहिती सुभाष राठोड यांनी दिली.


‘डायलर टोन’च्या माध्यमातून जनजागृती
कुपोषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी महिला व बालविकास विभागाने हाती घेतलेल्या पोषण महिना उपक्रमाची स्थानिक स्तरावर प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली आहे. दरम्यान, या उपक्रमासंबंधी तयार करण्यात आलेली ‘डायलर टोन’ महिला व बालविकास अधिकारी सुभाष राठोड यांनी जिल्हाभरातील आशा सेविकांच्या मोबाईलमध्ये अ‍ॅक्टिव्हेट करून दिली. आशा सेविकांच्या मोबाईलवर फोन करणाऱ्यांमध्ये यामुळे आपसूकच जनजागृती होत असल्याचे राठोड यांनी सांगतले.

Web Title: Vashim district begins Nutrition Month activities!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.