लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: कृषिप्रधान संस्कृतीत बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो; परंतु कृषी क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे यांत्रिक शेतीवर भर देण्यात येत आहे. याचा प्रत्यय हिंगोली जिल्ह्यातील कनेरगाव येथे बैलांऐवजी दरवर्षी ट्रॅक्टरचाच पोळा भरविला जातो. ट्रॅक्टर हे शेतीतील अत्यंत उपयोगी यंत्र असल्याने कनेरगावात ट्रॅक्टरलाच बैल म्हणून कनेरगावात ट्रॅक्टरचा पोळा मोठय़ा थाटामाटात साजरा केला जातो. शेतीत सध्या बैलजोड्या शेतकर्यांसाठी खर्चिक होत चालले असून, पशुधन जगवण्याएवढी ऐपत नसल्याने अलीकडच्या काळात शेतीत बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे. कनेरगाव परिसरात शेतीसाठी मागील दोन दशकापासून ट्रॅक्टरचाच वापर केला जात आहे. या ट्रॅक्टरची पूजा करून गावात पोळ्याच्या दिवशी मिरवणूक काढली जाते. ही परंपरा जोपासताना गावात बैलांप्रमाणेच ट्रॅॅक्टरची सजावट केली जाते. एका रांगेत ट्रॅक्टरला उभे करून ट्रॅक्टरची परंपरेनुसार मानकरी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या हस्ते पूजा केली जाते. यावेळी पूजेनंतर ट्रॅक्टरची गावातून मिरवणूक काढली जाते. ट्रॅक्टरच्या चाकाखाली काकडी फोडून परंपरेप्रमाणे ट्रॅक्टरला नैवेद्यदेखील दाखवला जातो. गावात ट्रॅक्टरला बैलजोडी असेच संबोधले जाते. यंदाही थाटामाटात ट्रॅक्टरचा पोळा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकर्यांनी जय्यत तयारीदेखील केलेली आहे. सोमवार, २१ रोजी याठिकाणी ट्रॅक्टरचा हा आधुनिक पोळा भरणार आहे.
आगळा वेगळा पोळायांत्रिक युगात अलीकडच्या काळात आधुनिक बदल होऊन बैलांचा वापर कमी झाला असला, तरी कनेरगावात ही परंपरा १९ वर्षांपूर्वीपासूनच सुरू झाली आहे. कै. शरद केशवराव जोशी यांच्या पुढाकारातून साकारली आहे. ती अद्यापही कायम आहे. कनेरगाव येथे भरविल्या जाणार्या पोळय़ात ५0 पेक्षा अधिक ट्रॅक्टर बैलांसारखे सजवून उभे केले जातात. बैलांप्रमाणेच त्यांची पूजाही केली जाते.