मंगरुळपीर : येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात अनेक वर्षापासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने विद्यार्थ्यांनी रिक्त पदे त्वरित भरण्यात यावे या मागणीसाठी २२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता महाविद्यालयाला टाळे ठोकले. महाविद्यालयात मागील सत्रापासून गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र हे महत्वपूर्ण विषय शिकविण्यासाठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शैक्षणिक सत्र सुरु झाल्यापासून एकही तासिका या विषयांची झाली नाही. एक महिन्यापूर्वी याच मागणीसाठी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. त्यावेळी आठ दिवसात शिक्षकाची पदे भरण्यात येईल असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी यशवंत मनवर व मुख्याध्यापक उज्वल टिकाईत यांनी दिले. मात्र आजपावेतो शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांंनी आज महाविद्यालयाला टाळे ठोकले . या आंदोलनाची दखल सभापती गोटे व भास्कर पाटील यांनी घेवून तात्काळ दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यासंदर्भात सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
विद्यार्थ्यांनी ठोकले महाविद्यालयाला टाळे
By admin | Updated: September 23, 2014 01:12 IST