पोहरादेवी येथे रामनवमी साधेपणाने साजरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:46 PM2021-04-22T12:46:37+5:302021-04-22T12:46:48+5:30

Ram Navami at Pohardevi : कोरोनामुळे यात्राैत्सवावर मर्यादा आल्याने मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम २१ एप्रिल रोजी पार पडले.

Simple celebration of Ram Navami at Pohardevi | पोहरादेवी येथे रामनवमी साधेपणाने साजरी 

पोहरादेवी येथे रामनवमी साधेपणाने साजरी 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी (ता. मानोरा) येथे दरवर्षी रामनवमी निमित्त आयोजित भव्य यात्रेला देशभरातील भाविकांची मांदियाळी असते. यंदा कोरोनामुळे यात्राैत्सवावर मर्यादा आल्याने मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम २१ एप्रिल रोजी पार पडले. श्री संत सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबीरदास महाराज यांनी सेवालाल महाराज मंदिरात तर गोर बंजारा धर्मगुरू बाबूसिंग महाराज व शेखर महाराज यांनी संत डॉ. रामरावबापू महाराज आश्रमात भाविकांविना धार्मिक विधी, पूजा अर्चना केली. 
रामनवमी निमित्त देशभरातील भाविक लाखोंच्या संख्येने जगदंबा देवी, जगद्गुरू संत सेवालाल महाराज, संत डॉ रामराव महाराज, दानशूर संत बाबनलाल महाराज समाधी स्थळी माथा टेकवण्यासाठी येतात. मात्र यावेळी कोरोना महामारीचा प्रकोप वाढल्यामुळे शासनाने यात्रेवर बंदी आणली. 
वाशिम जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भाविकांनी घरातच रामनवमी साधेपणाने साजरी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. व पोहरादेवी येथील संतमहंतांंच्या संमतीने यात्राैत्सव रद्द केल्यानंतर येथे भाविक येणार नाहीत, याची दक्षता घेण्यात आली. २१ एप्रिल रोजी संत सेवालाल ट्रस्टचे अध्यक्ष कबीरदास महाराज, संत डॉ. रामरावबापू महाराज आश्रमाच्या वतीने गोर बंजारा धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी लाऊडस्पीकर वरून गावातील नागरिकांनी घरूनच दर्शन घेण्याची विनंती केली. 
यावेळी सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करून कबीरदास महाराज यांनी जगद्गुरू संत सेवालाल महाराज मंदिरात व राष्ट्रीय संत डॉ. रामरावबापू महाराज आश्रमात गोर बंजारा समाज बांधवांचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज व शेखर महाराज यांनी धार्मिक पूजा अर्चा करून आरदास म्हणून भोगभंडारा अर्पण करण्यात आला. यावेळी बाबूसिंग महाराज यांनी देशातील कोरोना महामारीचे संकट दूर करण्याची प्रार्थना जगदंबा देवी, जगद्गुरू संत सेवालाल महाराज, संत डॉ. रामरावबापू महाराज यांच्याकडे केली. अनेक वर्षांपासून लाखोंच्या साक्षीने पार पडणारी ही यात्रा व भाविकांच्या गर्दीने गजबजून जाणारा परिसर सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे सामसूम होता.

Web Title: Simple celebration of Ram Navami at Pohardevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.