शेलूबाजार : गणपतीच्या बरोबरच गौरीचा सणही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. येथील साईनगरमधील रहिवासी पांडुरंग भगवान बेद्रे यांनी यावर्षी अंतराळाचा सुंदर असा देखावा तयार करून गौरीची स्थापना केली आहे. हा सुंदर देखावा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.
काही कुटुंबांत धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. काहीजण पत्र्याच्या, लोखंडी सळ्यांच्या किंवा सिमेंटच्या कोथळ्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवूनदेखील पूजा केली जाते. तर काही लोक गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. मात्र, येथील पांडुरंग बेद्रे हे दरवर्षी संकल्पनेतून विविध देखावे तयार करून गौरीची स्थापना करतात. यावर्षी त्यांनी अंतराळाचा सुंदर असा देखावा साकारला आहे. त्यामध्ये सूर्य, चंद्र, ग्रहणाचा हुबेहूब देखावा निर्माण केला आहे.
या आगळ्या वेगळ्या गौरीकडील देखावा पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. यापूर्वी त्यांनी अमरनाथ गुहा तयार करून त्यात गौरीची स्थापना केली होती. मात्र, यंदा त्यांनी अंतराळाचा सुंदर असा देखावा तयार करून गौरीची स्थापना मोठ्या थाटात केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून ते स्वत: व त्यांची पत्नी जयश्री यांनी हा सुंदर देखावा तयार करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.