लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. दोनच दिवसांत सहा बाजार समित्या आणि चार उपबाजार मिळून ७० हजार क्विंटलपर्यंत सोयाबीनची आवक झाली. त्यामुळे बाजार समिती प्रशासनावरील ताण वाढला असून, लिलावात अडचणीत येत असल्याने मोजणीवरही परिणाम होत आहे.वाशिम जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या काळात परतीच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसल्याने या शेतमालात ओलावा निर्माण झाला होता. आता मात्र सोयाबीन पूणपणे सुकले असून, शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पैशांची गरज आहे. शिवाय बाजार समित्यांत सोयाबीनला हमीदरापेक्षा अधिक दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई सुरू केली आहे. परिणामी, बाजार समित्यांत सोयाबीनची विक्रमी आवक होत आहे. सोमवारी कारंजा बाजार समितीत १८ हजार क्विंटल आवक झाली होती. तर वाशिम बाजार समितीतही ८ हजार क्विंटल आवक झाली होती. हे सोयाबीन पूर्णपणे मोजून घेण्यात आले नसतानाच मंगळवारी कारंजा बाजार समितीत १५ हजार क्विंटल, तर वाशिम येथील बाजार समितीत ११ हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्यामुळे शेडमध्ये सोयाबीन टाकण्यास जागाच उरली नाही. त्यामुळे बाजार समिती प्रशासनावरील ताण वाढला असून, सोयाबीनच्या मोजणीलाही विलंब होत आहे.(प्रतिनिधी)
वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 17:08 IST