वाशिम : कोरोना संसर्गाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात केवळ ३२ कोरोनाबाधित व्यक्ती उपचाराखाली असून, मानोरा, कारंजा, मालेगाव आणि वाशिम हे चार तालुके कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. तथापि, संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग सज्ज असून, नागरिकांनाही खबरदारी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात एप्रिल २०२० मध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात ६६५३ जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १४८ जणांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या लाटेत १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत ३४ हजार ७५१ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी ४७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मात्र कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागले. त्यात गेल्या १२ दिवसांत केवळ ३९ नवे कोरोनाबाधित आढळून आले, तर ३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे गेल्या १२ दिवसांत मानोरा तालुक्यात १, कारंजा, मालेगाव तालुक्यात प्रत्येकी २, तर वाशिम तालुक्यात केवळ ४ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे हे चार तालुके आता कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहेत. तथापि, कोरोना संसर्गाचा धोका अद्याप संपला नसल्याने आरोग्य विभाग संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्ज असून, नागरिकांनाही खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
------
१२ दिवसांत ३९ बाधित
रिसोड, मंगरूळपीरमध्ये प्रमाण अधिक
जिल्ह्यात गत १२ दिवसांत कोरोना संसर्गाचे नवे ३९ रुग्ण आढळून आले. त्यात मंगरूळपीर तालुक्यात १०, तर रिसोड तालुक्यात १८, वाशिम तालुक्यात ५, कारंजा आणि मानोरा तालुक्यात प्रत्येकी ३, तर मानोरा तालुक्यात केवळ १ रुग्ण आढळून आला. अर्थात रिसोड आणि मंगरूळपीर तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण इतर चार तालुक्यांच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसते. विशेष म्हणजे कोरोना लसीकरणात रिसोड तालुका आघाडीवर आहे.
---------------
मानोऱ्यात आठवड्यापासून नवा रुग्ण नाही
जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात असून, गेल्या १२ दिवसांत केवळ ३९ नवे रुग्ण आढळून आले, तर ३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात गेल्या आठवडाभरात मानोरा तालुक्यात केवळ १ नवा कोरोनाबाधित आढळल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. अर्थात मानोरा तालुक्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वांत कमी असल्याने येत्या काही दिवसांतच हा तालुका कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.
---------------
कोट : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आहे. लसीकरणासह कोरोना चाचण्यांनाही वेग देण्यात आला आहे. त्यामुळे बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करणेही शक्य होत आहे. तथापि, नागरिकांनी गाफील राहू नये, कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर झालेले नाही. त्यामुळे आवश्यक खबरदारी प्रत्येकानेच घेण्याची गरज आहे.
-डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी
--------
कोरोना संसर्गाची सद्य:स्थिती
एकूण बाधित - ४१६५३
उपचाराखाली- ३२
बरे झालेले- ४०९८४
मृत्यू -६३६