शहरांमध्ये माेकाट कुत्रे माेठ्या प्रमाणात फिरत असताना नगर परिषदेतर्फे काेणतीही उपाययाेजना करण्यात येत नाही. यासंदर्भात तक्रारीही आल्या तरी त्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे, कारण कुत्रे पकडण्यासाठी प्रशिक्षित वर्गच नाही. नगर परिषद प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली असता माेकाट कुत्र्यांवर नसबंदीच झाली नसून यासंदर्भात काेणत्याही प्रकारचे कंत्राट देण्यात आले नाही. शहरांमध्ये १७ प्रभाग असून एका प्रभागात जवळपास २५ कुत्री याप्रमाणे शहरात ४२५ कुत्री असल्याचे नगरपालिका प्रशासनाने कळविले आहे. परंतु यापेक्षा अधिक कुत्री शहरात फिरताना दिसून येतात. शहरात किती कुत्रे फिरताहेत याचा काेणत्याच प्रकारचा सर्व्हेही करण्यात आला नाही. यामुळे शहरात माेकाट कुत्र्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे.
.................
कुत्रे पकडण्यासाठी प्रशिक्षित वर्ग नाही
शहरातील माेकाट कुत्री पकडण्यासाठी, त्यांचा बंदाेबस्त करण्यासाठी काेणत्याच प्रकारचा प्रशिक्षित वर्ग नगरपालिकेमध्ये नाही. यामुळे एखाद्यावेळी काेणी तक्रारही केल्यास त्याच दखल घेतल्या जात नाही. नगर परिषदेमधील आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांना कुत्री पकडण्यासंदर्भातील काेणतेच प्रशिक्षण नसून प्रशिक्षित वर्गसुध्दा भरण्यात आला नाही.
..............
माेकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण(नसबंदी) करण्याचे नियाेजन आहे. यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करून यावर निर्णय घेण्यात येईल. आतापर्यंत गत पाच वर्षात कधीच नसबंदी करण्यात आलेली नाही.
- जितू बढेल
आराेग्य निरीक्षक, नगर परिषद , वाशिम
............
दखलच नसल्याने तक्रारीही नगण्यच
नगरपालिकेमध्ये माेकाट कुत्र्यांसदर्भात तक्रार करण्यातही आली तरी प्रशिक्षित वर्गच नसल्याने दखल घेतल्या जात नाही. यामुळे तक्रारीही नगण्य दिसून येत आहेत. महिन्यातून एखादी तक्रार नगर परिषदेकडे प्राप्त हाेत असल्याचे नगर परिषद प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
.............
खामगाव जिन रस्त्यांवर सर्वाधिक भीती
वाशिम शहरातील खामगाव जिन परिसरांमध्ये माेकाट कुत्र्यांचे प्रमाण अधिक आहे. या रस्त्यावर २४ तास माेकाट कुत्र्यांचा वावर हाेत असून ते वाहनांच्या मागेसुध्दा धावत आहेत. दुचाकी, चारचाकी वाहन गेल्यास एकाचवेळी कुत्र्यांची टाेळीच वाहनचालकांच्या मागे लागत असल्याचे दरराेज दिसून येते.