वाशिम : शाळा स्तरावर इयत्ता आठवीतील इच्छुक विद्यार्थ्यांना दरवर्षी राष्ट्रीय छात्र सेना अर्थात ‘एनसीसी’मध्ये प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया जुलै महिन्यात राबविण्यात येते. यंदा मात्र ऑगस्ट महिना संपत आला असतानाही वरिष्ठ स्तरावरून कुठलीच हालचाल नसून विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्या १७ महिन्यांपासून सर्वच ठिकाणच्या शाळा बंद आहेत. या धामधुमीत गतवर्षी जुलै महिन्यात अमरावती येथील ‘ग्रुप हेड क्वाॅर्टर’कडून जिल्ह्यातील शाळांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना ‘एनराॅलमेंट नंबर’ देण्यात आला. त्याआधारे वाशिम शहरातील बाकलीवाल विद्यालयातील ३८, न.प. महात्मा गांधी विद्यालय २५ आणि मंगरूळपीर येथील जि.प. शाळेतील ३८ अशा एकूण १०१ विद्यार्थ्यांना ‘एनसीसी’मध्ये प्रवेश मिळाला; मात्र चालूवर्षी ऑगस्ट महिना संपत आला असतानाही ‘एनराॅलमेंट नंबर’ अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. यामुळे प्रवेश प्रक्रियेस अद्यापपर्यंत सुरुवात होऊ शकली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
.......................
बाॅक्स :
आर्मीची चमू यंदा आलीच नाही
इयत्ता आठवीतील इच्छुक विद्यार्थ्यांना एनसीसीमध्ये प्रवेश देण्यापूर्वी त्यांची चाचणी घेण्याकरिता दरवर्षी ३ ते ५ जणांचा समावेश असलेली आर्मीची चमू शाळांमध्ये येत असते. चालूवर्षी मात्र अद्यापपर्यंत प्रवेश प्रक्रियाच सुरू झाली नसल्याने ही चमू आलेली नाही.
..................
शालेय जिवनात ‘एनसीसी’चे फायदे
एनसीसीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना ‘ए’ आणि ‘सी’ प्रमाणपत्र मिळते. लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये अधिकारी किंवा जवान म्हणून काम करण्याची संधी मिळते.
वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी अतिरिक्त तीन गुण मिळतात.
पॉलिटेक्निक महाविद्यालयात १५ जागा राखीव असतात.
राज्यस्तरावर नेतृत्व करणाऱ्या एनसीसी कॅडेटला अभियांत्रिकी महाविद्यालयात १० जागा राखीव असतात.
आयटीआयच्या प्रवेशासाठी अतिरिक्त गुण, पॅरामिलिट्री फोर्समध्ये १० गुण, टेलिकम्युनिकेशन भरतीमध्ये अतिरिक्त १० गुण, पोलीस भरतीमध्ये अतिरिक्त गुण, बीएसएफ, सीआरपीएफ आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळतात. ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केल्यास खासगी क्षेत्रात संरक्षण अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळते.
...............
कोट :
‘एनसीसी’च्या माध्यमातून विद्यार्थी दशेतच मुलांना शिस्त, संयम, परिश्रम आणि देशसेवेचे बाळकडू पाजले जाते. शिवाय विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच देशासाठी, मातृभूमीसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आणि जिद्द एनसीसीमुळे मिळते. यावर्षीही अनेक विद्यार्थी एनसीसीसाठी इच्छुक आहेत; मात्र प्रवेश प्रक्रियेसंबंधी कुठलाच निर्णय अद्याप झालेला नाही.
- अमोल काळे, एनसीसी अधिकारी, श्री बाकलीवाल विद्यालय, वाशिम