वाशिम : स्थानिक पाटणी चौक ते अकोला नाका या दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने, वाहतुकीसाठी एका बाजूचा रस्ता सुरू ठेवण्यात आला. दरम्यान, अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’ नसल्याने, या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
वाशिम शहरातील काही प्रमुख रस्ते खड्ड्यात गेल्याने याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. शहरातील काही रस्त्यांचे काम नव्याने हाती घेण्यात आले. स्थानिक पाटणी चौक ते अकोला नाका या दरम्यानच्या रस्त्याचे काम सुरू असून, वाहने जाण्यासाठी रस्त्याची एक बाजू खुली ठेवण्यात आली आहे. या अरुंद रस्त्याने दुचाकी, चारचाकी वाहनांचा प्रवास सुरू आहे. रस्ता अरुंद असल्याने ट्रक व अन्य अवजड वाहनांना प्रवेशबंदी असणे अपेक्षित आहे. मात्र, अवजड वाहनांना या मार्गावरून प्रवेशबंदी नसल्याने वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. जुनी जिल्हा परिषद, रेखाताई कन्या शाळेजवळ वाहतूक विस्कळीत होत असल्याने वाहन चालकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
.....
अवजड वाहनांना बंदी आवश्यक!
वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पाटणी चौक ते अकोला नाका या दरम्यानच्या रस्त्यावरून अवजड वाहनांना रस्ता काम पूर्ण होईपर्यंत प्रवेशबंदी असावी किंवा ठरावीक वेळ असावी, असा सूर शहरवासीयांमधून उमटत आहे.