मालेगाव (जि. वाशिम): मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणार्या कुरळा धरणाचा पाणीसाठा संपत आल्याने शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येत्या आठ दिवसात योग्य नियोजन न केल्यास शहरात पाणी पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मालेगाव शहराच्या आसपास कुरळा, कोल्ही व केळी अशी लहान मोठी धरणे आहेत. धरणांमधील कमी जलसाठा लक्षात घेऊन सिंचनासाठी पाणी घेण्याला मनाई आहे. तथापि, या प्रकल्पावरुन काही शेतकरी शेतीसाठी पाणी घेत असल्यामुळे एप्रिल महिन्यातच मालेगावकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ही धरणे शहराच्या जवळपास असल्याने त्या जवळच्या भागातील विहिरी, बोअरला चांगले पाणी असते; मात्र अखेरच्या टप्प्यात ते पाणी आटल्याने जवळच्या विहिरी बोअरसुध्दा आटतात. मालेगाव शहराची लोकसंख्या २५ हजाराच्या आसपास असल्याने आता जास्त पाण्याची गरज निर्माण झाली आहे. कुरळा धरणावरुन येणारी पाणी थेट पिण्यायोग्य नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. मालेगाव शहरात यापूर्वी चवथ्या दिवशी धरणातून पाण्याचा पुरवठा होत होता. त्यानंतर पाण्याची पातळी खाली गेल्याने आठव्या दिवसावर पाणीपुरवठा गेला. आता पाणी गढूळ असल्याने २0 ते २५ दिवस होऊनही पाणी आले नाही. त्यामुळे मालेगावकर त्रस्त झाले आहेत. पाण्यासाठी विविध ठिकाणी भटकंती सुरु आहे. बरेच नागरिक टँकरने पाणी विकत घेत आहेत. पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
मालेगावात भीषण पाणीटंचाई
By admin | Updated: April 24, 2015 02:00 IST