लोकमत न्यूज नेटवर्क मंगरुळपीर: शहरात शासनाच्या निधीतून मागील चार ते पाच महिन्यांपासून विविध विकास कामे करण्यात येत आहेत. यातील पूर्ण झालेली १४ कामे निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी नगरसेवकांकडून करण्यात आल्या आहेत. नगरसेवकांच्या तक्रारीची दखल वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लखन मलिक यांनी घेतली असून, या संदर्भात त्यांनी मंगरुळपीरच्या मुख्याधिकाऱ्यांना २८ जून रोजी एक पत्र पाठवून चौकशी करण्याची सूचना दिली आहे. मंगरुळपीर शहरांतर्गत विविध विकास कामे करण्यासाठी शासनाकडून २९ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरात पेव्हरब्लॉक रस्ते, तसेच नाल्यांच्या कामांसह इतर विकास कामे करण्यात येत आहेत. त्यामधील बहुतेक कामे पूर्ण झाली असून, एकूण १५ कामांपैकी १४ कामे निकृष्ट असल्याच्या तक्रारी नागरिक आणि नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांसह विविध स्तरावर केल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. याबाबत वाशिम-मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लखन मलिक यांच्याकडेही तक्रार करण्यात आली असून, त्यांनी नागरिकांसह नगरसेवकांच्या तक्रारीची दखल घेत मंगरुळपीर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र पाठवित सर्व कामांची चौकशी करून संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे व चालू असलेल्या आणि झालेल्या कामाची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभाग व गुणनियंत्रण विभागाकडून करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कामाचे देयक अदा करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. आता या संदर्भात नगरपालिकेच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंगरुळपीरमधील विकास कामांची चौकशी!
By admin | Updated: July 3, 2017 02:25 IST