वाशिम : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रात बालरोगतज्ज्ञांचा अभाव असल्याने ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. दुसरीकडे शहरी भागात जिल्हा सामान्य रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात आठ बालरोगतज्ज्ञ उपलब्ध आहे.
जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी ग्रामीण भागातच पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. पहिल्या लाटेत सुदैवाने बालकांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित होत आहे. दुसरी लाट ओसरली असतानाच, तिसऱ्या लाटेचा अंदाजही तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात बालरोगतज्ज्ञांची ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याला प्राधान्य दिले जात आहे. शहरी भागात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात येथे बालकांसाठी बेडची व्यवस्थाही केली. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय येथे सहा तर उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दोन बालरोगतज्ज्ञ उपलब्ध आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र एकही बालरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागाने ग्रामीण भागात विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.