वाशिम: अकोला-पूर्णा रेल्वे विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. अकोला ते हिंगोली या १२७ किलोमीटर मार्गाचे काम पूर्णत्वास गेले आहे. जून महिन्यात घेण्यात आलेले विद्युत चाचणी यशस्वी झाली होती. गाडी क्रमांक १७४२ नरखेड ते काचीगुडा इंटरसीटी एक्सप्रेस २४ सप्टेंबर रोजी हिंगोलीपर्यंत विजेवरील इंजिनवर धावल्याची माहिती रेल्वे स्टेशन प्रबंधक डी. चौधरी यांनी दिली.
अकोला ते वाशिम दरम्यान दोन टप्प्यात विद्युत चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर वाशिम ते हिंगोली दरम्यान रेल्वे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने २५ हजार व्होल्ट क्षमतेचा विद्युत प्रवास सोडण्यात आला. या मार्गावरून २५ जून रोजी विजेवरील रेल्वे इंजिन १०० किमी प्रति तासाच्या वेगाने धावले होते. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर शनिवारी इंटरसीटी एक्सप्रेस अकोला ते हिंगोली दरम्यान विजेवर धावली. सकाळी १०:४५ मिनिटांनी ही रेल्वे वाशिम रेल्वे स्थानकावर पोहचली. नियमित थांबा दिल्यांनतर गाडी हिंगोलीकडे रवाना झाली.