नंदकिशोर नारे / वाशिम: ग्रामपंचायत करवसुलीबाबत डिसेंबर २0१४ अखेर ७0 टक्के करवसुली अपेक्षित असताना जिल्हय़ातील बहुतांश ग्रामपंचायतीची कर वसुली ५0 टक्क्यांपेक्षा कमी झाल्याचे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत विभाग) यांच्या आकडेवारीवरून दिसून येते. दुष्काळी परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीमुळे कर वसुलीला ग्रामीण जनतेचा प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे अपेक्षित कर वसुली होत नाही, असे ग्रामसेवक संघटनेचे म्हणणे आहे. जिल्हय़ातील केवळ दोन तालुक्यातील ग्रामपंचायतीची करवसुली ५0 टक्क्यांपेक्षा जादा असली तरी अपेक्षितपेक्षा कमी आहे. डिसेंबर २0१४ अखेर ७0 टक्के करवसुली अपेक्षित असताना जिल्हय़ातील एकाही तालुक्याची टक्केवारी उद्दिष्टापर्यंत पोहोचलेली दिसून येत नाही. वाशिम तालुक्याची करवसुली ५२ टक्के, मालेगाव तालुका ४९ टक्के, रिसोड ४६ टक्के, मंगरूळपीर ४५ टक्के, मानोरा ५५ टक्के तर कारंजा तालुक्याची करवसुली टक्केवारी ४५ टक्के आहे. करवसुलीबाबत संबंधितांचे दुर्लक्ष दिसून येत आहे, असा ठपका ठेवल्यावर ग्रामसेवक संघटनेतर्फे, यावर्षीची दुष्काळी परिस्थिती व नैसर्गिक आपत्तीमुळे करवसुलीवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम, इंदिरा आवास योजना, विशेष घटक योजना, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान आदी योजनांतर्गत विकास कामेही मोठया प्रमाणात खोळंबली आहे. अपूर्ण असलेली बांधकामे विहीत मुदतीत पूर्ण करुन १00 टक्के उद्दिष्ट्य साध्य करावे व पूर्ण झालेल्या कामांचे पुर्णत्वाचे प्रमाणपत्र सर्व ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी तथा शाखा अभियंता, विस्तार अधिकारी यांनी सादर करण्याच्या सूचना या सभेत देण्यात आल्या.
ग्रामपंचायत करवसुली ५0 टक्क्यांपेक्षा कमी
By admin | Updated: February 4, 2015 01:26 IST