वाशिम : आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश घेण्यासाठी चवथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात ६३० पैकी ४२४ बालकांचे प्रवेश झाले असून, दोन दिवसांत २०६ बालकांचे प्रवेश झाले नाही तर पाचव्यांदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतात. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दिव्यांग गटातील बालकांना पहिल्या वर्गात २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्यासाठी चालू शैक्षणिक सत्रात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १०३ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी ७१८ राखीव आहेत. पहिल्या लॉटरी पद्धतीत १११९ अर्जातून ६३० बालकांची निवड झाली. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर ११ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरूवातीला ३० जूनपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत होती. त्यानंतर ९ जुलैपर्यंत, २३ जुलैपर्यंत आणि चवथ्यांदा ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे. मुदतवाढ मिळाल्यानंतरही प्रवेश प्रक्रियेला म्हणावी तशी गती मिळाली नसल्याचे दिसून येते. आतापर्यंत जिल्ह्यातील ६३० पैकी ४२४ बालकांचे प्रवेश झाले असून, अद्याप २०६ बालके मोफत प्रवेशापासून दूरच आहेत.
000000000000000
नोंदणी झालेल्या एकूण शाळा १०३
मोफत प्रवेशासाठी राखीव जागा ७१८
एकूण ऑनलाईन अर्ज १११९
पहिल्या लॉटरीत निवड झालेले ६३०
आतापर्यंत प्रवेश निश्चित झालेले ४२४
००००००००००
मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील १०३ शाळांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. पहिल्या लॉटरी पद्धतीत ६३० बालकांची निवड झाली असून, आतापर्यंत ४२४ बालकांचे प्रवेश निश्चित झाले. मोफत प्रवेशासाठी पालकांनी संबंधित शाळेत आवश्यक ती कागदपत्रे सादर करून प्रवेश निश्चित करावा.
- रमेश तांगडे
शिक्षणाधिकारी, वाशिम