यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला दमदार पाऊस झाला. यामुळे खरिपातील पिकांसोबतच भाजीपालावर्गीय पिकांची स्थितीही उत्तम राहिली. अपेक्षेपेक्षा अधिक उत्पन्न हाती पडल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर सध्या चांगलेच गडगडले आहेत. फुलकोबी, पत्ताकोबी, भेंडी, टमाटर, सिमला मिर्ची, मेथी, पालक, कोथिंबीर आदी पालेभाज्यांचे दर कमी झाले असून, व्यावसायिक त्यांच्या परीने फायद्याचा व्यवसाय करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा आलेली आहे.
..................
कोणत्या भाजीला काय भाव?
वांगी - १०/२०
टोमॅटो - १०/२०
भेंडी - ५/१०
पत्ताकोबी - १०/२०
फुलकोबी - १०/२०
काकडी - १०/१५
कारले - ३०/४०
मेथी - ५/१०
पालक - ५/१०
कोथिंबीर - २/४
दोडके - १०/२०
हिरवी मिरची - १०/२०
.............................
शेतकऱ्यांचा खर्चही निघेना...
शेतात दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केली. समाधानकारक पर्जन्यमान आणि अनुकूल हवामानामुळे उत्पादन चांगले झाले. मात्र, दर गडगडल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. लावलेला खर्चही यामुळे वसूल होईना.
-दिलीप मुठाळ
........................
शेतात यंदा पाण्याची मुबलक सोय आहे. त्यामुळे भाजीपाला पिकापासून चांगले उत्पन्न हाती पडेल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र चालू आठवड्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर कमी झाले असून, वाहतूक खर्चही निघणे कठीण झाले आहे.
-अतुल कुटे
.....................
ग्राहकांचा फायदा; मात्र नाराजीचा सूर...
हर्रासीतून व्यावसायिकांना कमी दराने भाजीपाला मिळतो. मात्र, तोच बाजारात किंवा घरासमोर विकत घेताना दर वाढलेले असतात. त्यातही अधिकांश भाजीपाला सडलेला निघत असल्याने तुलनेने दुहेरी नुकसान सहन करावे लागत आहे.
-मनीषा शिंदे
................
सर्वच भाजीपाल्याचे दर सध्या कमी झाले आहेत. मात्र, ग्राहकांना त्याचा विशेष फायदा होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. भाजीपाला विक्रेत्यांनी कधी- कधी ग्राहकांचाही विचार करायला हवा. दर कमी झाल्यास त्याचा लाभ ग्राहकांना मिळावा.
-अंजली देशमुख
................
भावात एवढा फरक का?
वाशिम शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दैनंदिन भाजीपाल्याची हर्रासी होते. त्याठिकाणी व्यावसायिकांकडून माल विकत घेऊन तो दिवसभर बाजारात बसून विकला जातो. स्वत:ची कमाई, वाहतूक खर्च जोडले जात असल्याने त्याचे दर दुप्पट होतात, असे काही व्यावसायिकांनी सांगितले.