उन्हाळी सोयाबीनच्या पेऱ्यावर शेतकऱ्यांचा भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:02 AM2021-02-23T05:02:26+5:302021-02-23T05:02:26+5:30

कोठारी : परिसरात गतवर्षी दमदार पाऊस पडला. त्यामुळे जलस्रोत तुंडुंब भरले. आता या जलस्रोतांमधील पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असून, ...

Farmers focus on summer soybean sowing | उन्हाळी सोयाबीनच्या पेऱ्यावर शेतकऱ्यांचा भर

उन्हाळी सोयाबीनच्या पेऱ्यावर शेतकऱ्यांचा भर

Next

कोठारी : परिसरात गतवर्षी दमदार पाऊस पडला. त्यामुळे जलस्रोत तुंडुंब भरले. आता या जलस्रोतांमधील पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असून, कोठारी परिसरात यावर्षी रब्बीचे क्षेत्र वाढले असून, उन्हाळी भुईमूग आणि मुगानंतर आता शेतकरी उन्हाळी सोयाबीनच्या पेरणीवर भर देत आहेत.

कोठारी परिसरात गतवर्षी दमदार पाऊस पडला. त्यामुळे जिल्हा परिषदेचा जलसंधारण सिंचन तलाव आणि लघु पाटबंधारे विभागाचा सिंचन प्रकल्प काठोकाठ भरले. त्याशिवाय विहिरी आणि कुपनलिकांची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. या जलसाठ्याचा फायदा करुन घेत शेतकऱ्यांनी यावर्षी रब्बी हंगामात हरभरा आणि गहू पिकासह इतर पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. या पिकांची काढणी करून शेतकऱ्यांनी आता उन्हाळी पिकांच्या पेरणीला सुरुवात केली आहे. त्यात सुरुवातीला उन्हाळी भुईमूग आणि उन्हाळी मुगाची पेरणी केली, तर आता उन्हाळी सोयाबीनच्या पेरणीवर शेतकरी भर देत आहेत. ‘महाबीज’च्या बिजोत्पादन प्रकल्पातही शेतकरी उन्हाळी सोयाबीनची पेरणी करत असल्याचे चित्र कोठारीसह परिसरात पाहायला मिळत आहे.

-------------

सोयाबीनच्या तेजीचा परिणाम

गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन घटल्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनची मागणी वाढली आणि सोयाबीनच्या दरात मोठी वाढ झाली. शासनाने सोयाबीनला ३,८८० रुपये प्रतिक्विंटलचा हमीदर घोषित केला असताना, व्यापाऱ्यांकडून या शेतमालाची हमीदरापेक्षा हजार रुपये अधिक दराने खरेदी केली जात आहे. त्यामुळेच उपलब्ध जलसाठ्याचा फायदा करुन घेत शेतकरी उन्हाळी सोयाबीनची पेरणी करत आहेत.

Web Title: Farmers focus on summer soybean sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.