मानोरा- तालुक्यातील मानोरा शेंदुर्जना रस्त्यावरील रतनवाडी या गावच्या प्रकल्पामध्ये जलराशी मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. हे बघण्यासाठी गर्दी हाेत असल्याने या स्थळाला पर्यटनस्थळाचे स्वरुप आले आहे.
फुलउमरी, उमरीखुर्द, पोहरादेवी, पाळोदी, शेंदुर्जना, आसोला,गव्हा, चिखली, देऊरवाडी, माऊली, सोमठाणा या गावातील व आजूबाजूच्या परिसरातील हौशी नागरिक मोठ्या प्रमाणात दररोज प्रचंड संख्येने या लघु प्रकल्पातील ओसंडून वाहणाऱ्या धबधब्याला भेट देऊन चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद लुटीत आहेत.
मानोरा तालुक्यामध्ये पाटबंधारे विभाग, मृद व जलसंधारण विभाग यांचे मिळून लहान-मोठी एकोणीसच्या जवळपास जलप्रकल्पे आहेत. मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊसधारा कोसळत असल्याने जवळपास सगळी धरणे काठोकाठ भरली आहेत.
धबधब्याला भेट देणाऱ्या हौशी पर्यटकांनी अतिउत्साहाच्या भरात धरण क्षेत्राकडे न जाण्याचा सल्ला जागरुक नागरिकांकडून देण्यात येत आहे.