गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यात सोमवारी दुपारनंतर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. कारंजा तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक होते. या तालुक्यातील धनज बु. सह परिसरात मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार धनज बु. परिसरात सोमवारी रात्री तब्बल १२० मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला, तर धरणे, कूपनलिका, विहिरींची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. या पावसामुळे आता रब्बी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे.
---------
अनेक शेतात शिरले पाणी
धनज बु. परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. यामुळे नदी नाल्यांच्या काठालगत असलेल्या अनेक शेतात पाणी शिरून तलावाचे रुपच प्राप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शेतात साचलेल्या पाण्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे.