- नरेश आसावा
लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : राज्यभरात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. वºहाडात तर सूर्य अक्षरश: आग ओकतोय. या दुष्काळी स्थितीत कुटुंबासह भटकंती करणाऱ्या एका मेंढपाळ कुटुंबातील महिलेवर रखरखत्या उन्हात शेतात उभारलेल्या पालात बाळाला जन्म देण्याची वेळ ओढवली. ही घटना इंझोरी शिवारात घडली. सिंधू सुभाष कोरडकर, असे बाळाला जन्म देणाºया मातेचे नाव आहे.राज्यातील काही भागाप्रमाणेच अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात शासनाने मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला असून, त्याच्या झळा अतिशय तीव्र झाल्या आहेत. या तालुक्यातील अनेक गावांत पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळेच या तालुक्यातील शेकडो शेतमजूर आणि पशुपालकांनी स्थलांतर केले आहे. याच तालुक्यातील नेवसाळ गावातील देवीदास सदाशिव कोरडकर यांच्यासह १५ कोरडकर कुटुंब हजारो शेळ्या-मेंढ्या घेऊन वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात भटकंती करीत आहेत. गावात माणसालाच पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने पशुधन जगवावे कसे, हा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे होता. रखरखत्या उन्हात केवळ स्वत:ला पिण्यास पाणी मिळावे आणि पशूंचे पोषण व्हावे म्हणून ते भटकंती करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या १५ कुटुंबांनी इंझोरी शिवारातील अजय ढोक यांच्या शेतात पाल ठोकून तळ मांडला आहे. दिवसाला पुरुष मंडळी शिवारात शेळ्या-मेंढ्या चारतात आणि रात्री शेतात काही जण त्यांची रखवाली करीत बसतात. अशात या कुटुंबातील महिला, मुलांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. त्यात सिंधू सुभाष कोरडकर ही महिला गर्भवती असतानाही तिला परिवारासोबत फिरावे लागत होते. घरापासून शेकडो किलोमीटर दूर असल्याने प्रसूतीचा काळ जवळ आला असतानाही तिला आवश्यक पोषण आहारही मिळत नव्हता. अशातच रविवार, २८ एप्रिल रोजी तिला प्रसवकळा सुरू झाल्या आणि जवळपास ४४ अंश तापमानात रखरखत्या उन्हात शेतातील पालातच कुठल्याही आरोग्य सुविधाविना तिची प्रसूती झाली. तिने एका गोंडस बालकाला जन्म दिला. दुष्काळाच्या विदारकतेमुळे या महिलेवर ही वेळ ओढवली.