जिल्ह्यात जून ते १३ सप्टेंबरदरम्यान ७०८ मि.मी. पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात ८५१.६० मि.मी. पाऊस पडला. त्यात गेल्या आठवडाभरातच अर्थात ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबरदरम्यान २९ मि.मी. पावसाची नाेंद झाली. यात सोमवार ६ ते मंगळवार ७ सप्टेंबरदरम्यानच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४७.७० मि.मी. पाऊस पडला. या पावसामुळे मोलमजुरी करणाऱ्या गरिबांच्या घराला धोका निर्माण झाला. त्यात कारंजा, मंगरुळपीर आणि मानोरा तालुक्यात मिळून सहा घरे काेसळल्याच्या घटनाही घडल्या. सुदैवाने यात जीवितहानीसारखी अप्रिय घटना टळली तरी या गरीब कुटुंबांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्यांचे मोठे नुकसान झाले. संबंधित विभागाने आपदग्रस्त ग्रामस्थांच्या घरांच्या पडलेल्या भिंतीचे तातडीने पंचनामे करून मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
०००००००००००००००००
कोठेकोठे घडल्या घटना
मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे ८ सप्टेंबरला बंडू ऊर्फ महादेव पारधी यांच्यासह इतर काही कामगारांची घरे कोसळली. कारंजा तालुक्यातील धनज बु. येथील सुनील डफडे यांचे घर सततच्या पावसामुळे १० सप्टेंबर रोजी कोसळले. उंबर्डा बाजार येथील मीना हुतके, प्रमोद धोपे, गणेश ठाकरे, उमेश ठाकरे, मयूर बुरघाटे, मुमताजबी शे.इसाक यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या घरांच्या मातीच्या भिंती ८ सप्टेंबर रोजी जमीनदोस्त झाल्या, तर काजळेश्वर येथील प्रल्हाद मनिराम पवार आणि गणेश विष्णू राठोड यांच्या घराच्या भिंती पावसामुळे कोसळल्या.
००००००००००००००
घरकुलाच्या लाभाअभावी जीव धोक्यात
शासनाकडून आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि कुडामातीच्या घरात राहणाऱ्या कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास, इंदिरा आवास, रमाई आवास योजना अस्तित्वात आणल्या. त्याचा लाभ मिळावा म्हणून अनेकांनी प्रशासनाकडे अर्जही केले. त्यातील काहींना घरकुल मंजूर झाले असले तरी अनुदान रखडले आहे, तर काहींना घरकुलच मंजूर झाले नसल्याने त्यांचे घराचे स्वप्न अर्धवटच असून, सततच्या पावसामुळे मातीची घरे कोसळून त्यांच्या जिवाला धोका आहे.
०००००००००००००००००
कोट: शासनाकडून घरकुल योजना राबविल्या जातात. घर नसलेल्यांना अर्ज करण्यासही सांगितले जाते; परंतु अर्ज केल्यानंतर विविध अटी घालून वंचित ठेवले जाते. कधी ८ नसल्याचे, तर कधी कर भरला नसल्याचे सांगून प्रशासनाकडून योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे मातीच्या घरात जीव धोक्यात घालून राहावे लागते.
-विष्णू राठोड,
आपदग्रस्त काजळेश्वर
००००००००००००००००००००००००
कोट: गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या भिंतीत पाणी मुरल्याने भिंत कोसळली, आम्ही झोपेत असताना ही घटना घडली. सुदैवाने आमचे प्राण वाचले. शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला, तर आम्ही सुरक्षितपणे जीवन जगू शकतो. जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी.
- सुनील डफडे,
आपदग्रस्त, धनज बु.
०००००००००००००००००००००००००