वाशिम: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या सहस्त्र सिंचन विहिर योजनेला तक्रारींचे ग्रहण लागले आहे. लाभार्थींची निवड करण्यासाठी आयोजित ग्रामसभेपासून ते थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या योजनेबाबत विविध प्रकारच्या शेकडोवर तक्रारी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा प्रशासनाकडून सहस्त्र सिंचन विहिर योजना राबविण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर शासनाने वाशिम जिल्ह्यात सन २०१७ साठी प्रत्येक तालुक्यात हजार या प्रमाणे सहस्त्र सिंचन विहीर योजना राबविण्यास मान्यता दिली. या योजनेतत अनुक्रमे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंब, स्त्री कर्ता प्रधान कुटुंब, शारिरिकदृष्ट्या विकलांग कर्ता असलेजले कुटुंब, जमिन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अशा प्राधाण्यक्रमानुसार लाभार्थींची निवड करण्याचे निश्चित झाले. यासाठी किमान ०.६० हेक्टर क्षेत्र असलेले शेतकरी, तसेच एकापेक्षा अधिक मिळून संयुक्त विहिर घेऊ शकणारे आणि ०.६० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र असणारे, तसेच पूर्वीच्या विहिरीपासून किमान ५०० फुट दूर शेत असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. या लाभार्थींची निवड ग्रामसभेत करण्याचे निश्चित झाल्यानंतर त्यांच्याकडून २५ डिसेंबर २०१६ पर्यंत पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमार्फत अर्ज मागविण्यात आले. त्या प्रक्रियेनंतर लाभार्थींच्या निवडीसाठी ग्रामसभांचे आयोजनही करण्यात आले आणि लाभार्थींची निवडही झाली; परंतु पूर्ण पारदर्शक निवड प्रक्रिया राबविण्यात येत नसल्याच्या आणि हेतूपुरस्सर योजनेपासून वंचित ठेवण्यात येत असल्याच्या तोंडी तक्रारी विविध ठिकाणच्या १५६ पेक्षा अधिक लाभार्थींनी केल्या, तर याच स्वरूपाच्या जवळपास २० तक्रारी गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांपर्यत करण्यात आल्या आहेत.
सहस्त्र सिंचन विहिर योजनेला तक्रारींचे ग्रहण
By admin | Updated: March 30, 2017 13:56 IST