कामरगाव : येथील वीज उपकेंद्राशी जोडलेल्या गावांतील शेतकरी, ग्रामस्थांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा, या उद्देशाने ५८० किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी येथे करण्यात आली. या प्रकल्पाचे लोकार्पण २६ जानेवारी रोजी करण्यात येणार होते; परंतु त्यापूर्वीच या प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्याने लोकार्पण लांबणीवर पडले. आता दुरुस्तीनंतरच या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.
कामरगाव परिसरातील ४० गावांतील शेतकरी, ग्रामस्थांना वीजपुरवठा करण्यासाठी काही वर्षांपूर्वी कामरगाव येथे ३३ के.व्ही. वीज उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. तथापि, कमी दाबामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या येथे उद्भवत होती. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य वीज ग्राहकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर उपाय म्हणून महावितरणने कामरगाव येथे सौर कृषी वाहिनीअंतर्गत ५८० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण २६ जानेवारीला करण्याचे ठरले होते, त्यापूर्वीच या सौर ऊर्जा प्रकल्पात तांत्रिक बिघाड उद्भवल्याने लोकार्पण रखडले. आता तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतर लवकरच साैर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित अभियंत्यांनी गुरुवारी दिली. त्यामुळे कामरगाव परिसरातील नागरिकांना योग्य दाबाच्या वीजपुरवठ्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.