लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम तालुक्यातील तांदळी शेवई येथे सामाजिक सभागृह बांधकामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २० जुलैपासून नागरिकांनी पुकारलेल्या अर्धनग्न उपोषण आंदोलनाची २४ जुलै रोजी रात्री ९ वाजतादरम्यान सांगता झाली. सामाजिक सभागृह बांधकामासंदर्भात तहसिल प्रशासनाने आश्वासन दिल्याने उपोषण आंदोलन मागे घेतल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.तांदळी शेवई येथे मातंग समाजाला गावामध्ये एकत्र बसवून विचार विनिमय करण्यासाठी अथवा लग्नप्रसंगी कुठलीही जागा उपलब्ध नाही. त्यामुळे समाजबांधवांनी ग्रामसभेमध्ये भाग घेवून सन २०१६ - १७ पासून मातंग समाजाच्या सभागृहासाठी प्रयत्न करीत आहेत. गावाला लागून गट नंबर १८० ई-क्लासममधील २० गुंठे जमिनीवर समाजबांधवांचा मागील २० वर्षापासून ताबा आहे. परंतू, सामाजिक सभागृह बांधकामासाठी जागेसंदर्भात रितसर आदेश झालेला नसल्यामुळे गावामध्ये निधी उपलब्ध असून सुध्दा ग्रामपंचायत बांधकाम करु शकत नाही. त्यासाठी शासनाने सामाजिक सभागृह बांधकामासाठी गट नं.१८० मधील २० गुंठे जागा उपलब्ध करुन देण्याचा आदेश द्यावा; अन्यथा उपोषणाला सुरुवात करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात यापूर्वी दिला होता. परंतू, रितसर आदेश झाले नाहीत. त्यामुळे तांदळीशेवई येथील समाजबांधवांनी २१ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. पहिल्या दिवशी कुणी लक्ष दिले नाही. दुसºया दिवशी २२ जुलै रोजी अर्धनग्न उपोषण करण्यात आले. चवथ्या दिवशी २४ जुलै रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास तहसिल प्रशासनाच्या प्रतिनिधीने उपोषणास भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. शासन निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
सामाजिक सभागृहासाठी आश्वासन; गावकऱ्यांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 16:38 IST