गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ या घोषणेसह ढोल-ताशांच्या गजरात शुक्रवारी जिल्ह्यात गणरायांचे जल्लोषात स्वागत झाले. सार्वजनिक गणेश मंडळांकडून ‘बाप्पां’ची हर्षोल्हासात स्थापना करण्यात आली. मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असणाऱ्या गणरायांचे आगमन होताच गणेशभक्तांमध्ये उत्साह ओसंडून वाहात असल्याचे दिसून आले. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, जागोजागी वाहतुकीची कोंडी आणि रस्त्यांवरचे लहान-मोठे खड्डे चुकवत गणराय घरोघरी पोहोचले.
........................
गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारात उडाली झुंबड
सार्वजनिक गणेश मंडळांसह घरोघरी मोठ्या संख्येने शुक्रवारी ‘श्रीं’ची विधीवत स्थापना करण्यात आली. सकाळच्या सुमारास घरगुती गणेशमूर्तींच्या खरेदीसाठी वाशिम शहरातील नगर परिषद चौक मार्ग, पाटणी चौक आदी ठिकाणी भाविकांची झुंबड उडाली होती. पूजेचे साहित्य आणि गणेशमूर्तींसह मोरयाचा गजर झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते नगर परिषद चौक या दरम्यान एका मंगल कार्यालयाजवळचा रस्ता पोलिसांनी दुचाकी वाहनांसाठी बंद ठेवला होता. गणरायांसमोर आरास करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्य खरेदीसाठी भाविकांनी स्थानिक पाटणी चौकस्थित बाजारात एकच गर्दी केली. दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीद्वारे मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
.....................
पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात
गणेशोत्सवादरम्यान शांतता राखावी, यासाठी पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. वाशिमप्रमाणेच रिसोड, कारंजा, मानोरा, मालेगाव, मंगरूळपीर व ग्रामीण भागात ढोल-ताशांचा निनाद व मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात सर्वत्र बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यासाठी भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले होते.