७० वर्षीय ‘प्यारेलाल’ यांनी जोपासला ऐतिहासिक ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 11:03 AM2021-08-19T11:03:30+5:302021-08-19T11:03:36+5:30

Washim News : गत ४० वर्षापासून हजारो विविध वस्तू एकत्र करून ते आपला छंद वेगळ्या पद्धतीने जोपासत आहेत.

70-year-old Pyarelal keeps historic things | ७० वर्षीय ‘प्यारेलाल’ यांनी जोपासला ऐतिहासिक ठेवा

७० वर्षीय ‘प्यारेलाल’ यांनी जोपासला ऐतिहासिक ठेवा

Next

वाशिम : नोकरीच्या धावपळीतून फावला वेळ काढत कारंजा शहरातील ७० वर्षीय प्यारेलाल गुप्ता यांनी पुरातनकालीन वस्तू संग्रहाचा अनोखा छंद जोपासला आहे. गत ४० वर्षापासून हजारो विविध वस्तू एकत्र करून ते आपला छंद वेगळ्या पद्धतीने जोपासत आहेत.
गुप्ता यांनी एसटी महामंडळात ३० वर्ष कनिष्ठ सहायक पदावर नोकरी केली आणि सेवानिवृत्त झाले. याच दरम्यान अकोला येथे नोकरी करीत असताना त्यांना पुरातन वस्तूचा संग्रह करण्याचा छंद लागला. यामध्ये प्यारेलाल यांनी धातूच्या विविध मुर्त्या, नाणी, गृह उपयोगी वस्तू, दिवे, ढाल, अजबगजब वस्तू, पाळीव प्राण्याचे सजावट साहित्य, वजन मापे यासह अन्य पुरातन वस्तूचा समावेश आहे.

नोकरीवर असताना त्यांची एका भंगारच्या दुकानवर नजर गेली. एक सुबक धातूची मूर्ती तुटताना पाहिली आणि ती विकत घेतली. तेथून हा छंद सुरु झाला, असे ते अभिमानाने सांगतात. आज हजारो वस्तूच्या स्वरुपात हा छंद पोहचला आहे. याकरिता त्यांना अनेक वेळा उपाशी राहून वस्तू विकत आणल्या. ३० वर्षापूर्वी दोन लाख खर्च केला. लोकांसाठी काही करता येईल का आणि इतिहास जोपासल्या जाईल या प्रयत्नातून हा छंद सुरु केला, असेही प्यारेलाल सांगतात.
 

कुटुंबियांचा रोषालाही जावे लागले सामोरे
या छंदामुळे अनेक वेळा परिवारातील लोकांना त्रास सहन करावा लागला. काही वेळा कुटुंबियांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. मात्र परिवाराची समजूत काढून प्यारेलाल यांनी छंद सुरु ठेवला. त्या वेळी झालेला त्रास आज परिवाराच्या लोकांना वेगळा गर्व आणि आनंद देवून जात आहे. घरच्या बच्चे कंपनी आणि त्यांच्या मित्रांना हा अनमोल ठेवा पाहण्याचा वेगळा आनंद देवून जाते.

 

इतिहासप्रेमीसाठी पर्वणी 
ऐतिहासिक बाजार पेठ म्हणून कारंजा शहराचा उल्लेख केला जातो. आजहि अनेक पुरातन वास्तू कारंजा शहरात आहेत. मात्र जिल्ह्यात पुरातन ठेवा जोपासणाऱ्या व्यक्ती बोटावर मोजण्याइतपतही नाहीत. प्यारेलाल यांनी जोपासलेला ठेवा हा इतिहासप्रेमीसाठी पर्वणी ठरू शकते. मात्र त्याकरिता प्यारेलाल यांना आर्थिक पाठबळाची गरज आहे. प्रशासन आणि शासन यांची मदत मिळाली तर मोठ्या संग्रहालयाची निर्मिती करणे अधिक सुलभ होइल.

Web Title: 70-year-old Pyarelal keeps historic things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.