जिल्ह्यातील २५० शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत होणार बदल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:37 AM2021-04-14T04:37:13+5:302021-04-14T04:37:13+5:30

वाशिम : ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार, जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत यंदा किंचितसे बदल केले असून, मे महिन्यात बदल्यांची प्रक्रिया ...

250 teachers of the district will be transferred within the district! | जिल्ह्यातील २५० शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत होणार बदल्या!

जिल्ह्यातील २५० शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत होणार बदल्या!

googlenewsNext

वाशिम : ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार, जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत यंदा किंचितसे बदल केले असून, मे महिन्यात बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या जवळपास २५० शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या होणार असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्हा परिषदांतर्गत शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या आणि आंतरजिल्हा बदल्यांच्या मार्गदर्शक सूचना शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ७ एप्रिल रोजीच्या निर्णयानुसार जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया मे महिन्यात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत मराठी व उर्दू माध्यमाच्या २४० ते २६० प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने तयारी सुरू केली असून, बदल्यांसाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे अवघड व सोपे क्षेत्र निश्चित करणे, जिल्ह्यातील कार्यरत सर्व शिक्षक, तसेच बदली पात्र व बदली अधिकारपात्र शिक्षकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे.

०००

बॉक्स

नवीन सूचनांमध्ये असे करण्यात आले बदल!

शासन निर्णयानुसार, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या व आंतरजिल्हा बदल्यांच्या सूचनांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा अंतर्गत बदलीसाठी यापूर्वी बदलीपात्र शिक्षकाची जिल्ह्यातील सलग दहा वर्षे सेवा व कार्यरत शाळेवरील तीन वर्षे सेवा ग्राह्य धरण्यात येत होती. नवीन सूचनांनुसार बदलीपात्र शिक्षकांची जिल्ह्यातील सलग दहा वर्षे सेवा व शाळेवरील पाच वर्षांची सेवा ग्राह्य धरण्यात येणार आहे. बदलीसाठी यापूर्वी २० शाळांचा पर्याय होता, आता ३० शाळांचा पर्याय देण्यात आला आहे, तसेच आंतरजिल्हा बदलीसाठी यापूर्वी एकच जिल्हा परिषद देण्याचा पर्याय होता, आता चार जिल्हा परिषदांचा पर्याय देता येणार आहे.

००००

बॉक्स

आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येऊ शकतात १५ ते २० शिक्षक

जिल्ह्यात शिक्षकांची फारशी पदे रिक्त नसल्याने आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांची संख्या नगण्य राहणार आहे; साखळी पद्धतीने बदल्या झाल्यास आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात १५ ते २० शिक्षक येऊ शकतात आणि जिल्ह्यातील १५ ते २० शिक्षक आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची शक्यता आहे.

००००

बॉक्स

कोणाच्या होणार बदल्या?

जिल्ह्यात दहा वर्षे व सद्य:स्थितीत कार्यरत शाळेत पाच वर्षे सेवा पूर्ण झालेल्या, तसेच अवघड क्षेत्रात तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांची विनंतीवरून बदली होऊ शकते, तसेच आंतरजिल्हा बदल्यांमध्ये जिल्ह्यातील किमान पाच वर्षे सेवा झालेल्या व संबंधित पदावर कायम असलेल्या, तसेच विशेष संवर्ग भाग १ व २ मधील किमान तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होऊ शकते.

००००

बॉक्स

जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या आणि आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया ही शासन निर्णयानुसार होणे सर्वांना अपेक्षित आहे. या बदल्या करण्यापूर्वी शिक्षकांच्या गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याची शिक्षक संघटनांची मागणी आहे.

- सतीश सांगळे

सचिव, शिक्षक समिती, वाशिम

Web Title: 250 teachers of the district will be transferred within the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.