लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने हाती घेतलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ६० हजार पात्र शेतकरी कुटूंबांची माहिती संकलित करण्यात आली आहे. कुटूंबनिहाय वर्गीकरण प्रक्रिया पूर्ण करून याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी शुक्रवारी दिली.किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंब निश्चित करणे आणि याकरिता राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, कृषी गणना २०१५-१६ व नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपाकरिता तयार करण्यात आलेली माहिती प्राप्त करून विहित नमुन्यात नोंद करणे. योजनेची गावात व्यापक प्रसिद्धी करून मोहीम स्वरुपात गावातील शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक प्राप्त करणे व त्याच्या नोंदणी विहित नमुन्यात करण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणांवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार, तलाठ्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव यांच्या समितीने ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान गावनिहाय पात्र १.६० लाख खातेधारक शेतकºयांची यादी तयार केली असून १० ते १२ फेब्रुवारीदरम्यान कुटुंबनिहाय वर्गीकरण करून गावनिहाय याद्या देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्या प्राप्त झाल्यानंतर पात्र शेतकरी कुटुंबांच्या याद्यांमध्ये आवश्यक दुरूस्त्या करून अंतिम यादी २० ते २१ फेब्रुवारीदरम्यान त्या-त्या तहसील कार्यालयास सादर केली जाईल, असे शैलेश हिंगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ग्रामस्तरावरून १.६० लाख शेतकरी कुटूंबांची माहिती संकलित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 15:35 IST