वाशिम जिल्ह्यात कोरोनामुक्त गाव पुरस्कारासाठी १०९ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 10:50 AM2021-07-24T10:50:56+5:302021-07-24T10:51:18+5:30

109 proposals for Corona Free Village Award in Washim District : निकषांमुळे प्रस्ताव दाखल करण्यास ग्रामपंचायती उदासीन असल्याचे चित्र आहे.

109 proposals for Corona Free Village Award in Washim District | वाशिम जिल्ह्यात कोरोनामुक्त गाव पुरस्कारासाठी १०९ प्रस्ताव

वाशिम जिल्ह्यात कोरोनामुक्त गाव पुरस्कारासाठी १०९ प्रस्ताव

Next

- दादाराव गायकवाड
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे, यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा राबविण्याची घोषणा ग्रामविकास मंत्र्यांनी केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातून २३ जुलैपर्यंत केवळ १०९ प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर दाखल झाले आहेत. योजनेच्या निकषांमुळे प्रस्ताव दाखल करण्यास ग्रामपंचायती उदासीन असल्याचे चित्र आहे.
कोरोनामुक्तीच्या उपक्रमास  चालना देण्यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार असून, राज्यातील ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकूण १८ बक्षिसे दिली जाणार आहेत. या शिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना लेखाशीर्ष पंचवीस पंधरा (२५-१५) व तीस चौपन्न (३०-५४) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींसाठी  विकास कामे मंजूर केली जाणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील ४९१ पैकी केवळ १२१ ग्रामपंचायतींनी या स्पर्धेंतर्गत प्रस्ताव दाखल केले आहेत  दरम्यान, जिल्हयातील निम्यावर ग्रामपंचायती काेराेनामुक्त झालेल्या आहेत. ही बाब पाहता ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची अपेक्षा आहे.
गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन
कोरोनामुक्त गाव पुरस्कार स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. हे गुणांकन ५० गुणांचे राहणार असून, १ जून २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत ग्रामपंचायतींनी केलेले काम विचारात घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक ग्रामपंचायती सद्यस्थितीत कोरोनामुक्त असताना त्यांच्या कामगिरीत सातत्य राखले जावे आणि त्यांच्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी स्पर्धेसाठी प्रस्ताव सादर करणे अपेक्षीत असताना जिल्ह्यात केवळ १२१ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. 


ग्रामपंचायत स्तरावर ५ पथकांची स्थापना 
कोरोनामुक्त गाव स्पर्धेंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावर ५ पथकांची स्थापना करुन त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवायचे आहेत. यामध्ये ग्रामपंचायत प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष स्थापन करुन त्यासाठी कार्यवाही करणारे पथक, कोरोना तपासणीसाठी व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाचे पथक, कोविड हेल्पलाईन पथक आणि लसीकरण पथक या पथकांचा समावेश असेल. 


कारंजा, रिसाेड तालुका निरंक
ग्रामविकास मंत्रालयाने गाव स्पर्धा राबविण्याची घाेषणा 
केल्यानंतर जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविण्यात आले. या अंतर्गत जिल्ह्यातील चार तालुक्यातून प्रस्ताव प्राप्त झाले असले तरी कारंजा, रिसाेड तालुक्यातून मात्र अद्याप एकही प्रस्ताव पं. स.ला प्राप्त झाला नाही. उर्वरित चार तालुक्यातून पंचायत समितीच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. 

Web Title: 109 proposals for Corona Free Village Award in Washim District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.