कामगारांनीच केला सुरक्षेचा जागर
By Admin | Updated: March 12, 2016 01:51 IST2016-03-12T01:51:03+5:302016-03-12T01:51:03+5:30
औद्योगिक कामगारांमध्ये सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी आणि त्यांना सुरक्षेची जाणीव व्हावी, यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांच्या वतीने शुक्रवारी औद्योगिक सुरक्षा रॅली काढण्यात आली

कामगारांनीच केला सुरक्षेचा जागर
अंबरनाथ : औद्योगिक कामगारांमध्ये सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी आणि त्यांना सुरक्षेची जाणीव व्हावी, यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांच्या वतीने शुक्रवारी औद्योगिक सुरक्षा रॅली काढण्यात आली. या रॅलीला झालेली गर्दी हेच सुरक्षा सप्ताहाचे यश होते. सुमारे १० हजारांहून अधिक कामगार या रॅलीत सहभागी झाले होते.
राज्य सरकारच्या वतीने सुरक्षा सप्ताहानिमित्त राज्यात विविध कार्यक्रम सुरू आहेत. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांच्या वतीने सुरक्षा ज्योत राज्यभरात फिरविली जात आहे. ४ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर येथे ज्योत प्रज्वलित करण्यात आली. ही सुरक्षा ज्योत शुक्रवारी अंबरनाथ-आनंदनगर औद्योगिक वसाहतीत आणण्यात आली. कामगारांमध्ये सुरक्षेविषयी जनजागृती व्हावी, या हेतूने रॅली काढण्यात आली. ठाणे जिल्ह्यातून विविध कंपन्यांमधील कामगार रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी सकाळी ८ वाजताच उपस्थित होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरक्षेविषयी माहितीपट सादर करण्यात आला. तसेच पथनाट्य आणि समूहगीतांच्या माध्यमातून सुरक्षेचा संदेश कामगारांनीच दिला. अंबरनाथ येथील ‘आमा’ संघटनेच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांना ठाणे औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक अ.रा.अष्टपुत्रे आणि कल्याण येथील औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक रा. बा.लाखे यांनी सहकार्य केले. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक जयंत मोडगरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. आनंदनगर येथील निवासी शिबिर मैदानावरून रॅलीला प्रारंभ झाला. संपूर्ण आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधून ही रॅली काढण्यात आली. रणरणत्या उन्हातही कामगारांचा रॅलीमधील उत्साह किंचितही कमी झाला नव्हता.
रॅलीला मार्गदर्शन करताना आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी कामगारांनीच कामगारांच्या सुरक्षेसाठी एकत्रित येण्याची गरज आहे, असे सांगितले. आपल्या हातून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी स्वत: कामगारांनी सुरक्षेची साधने वापरावीत. कंपनीत मालक आणि कामगार यांच्यात तेढ निर्माण होत नाही, याची जाणीव करून देत असताना त्यासाठी ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे हे प्रयत्नशील दिसतात, असेही स्पष्ट केले. (प्रतिनिधी)