पोलीस असल्याची बतावणी करून महिलेस लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 22:58 IST2019-07-24T22:57:53+5:302019-07-24T22:58:10+5:30
विरारमधील घटना : ६० हजारांचा ऐवज केला लंपास

पोलीस असल्याची बतावणी करून महिलेस लुबाडले
नालासोपारा : विरार पश्चिमेकडील वायके नगर येथील एक्सपर्ट शाळेजवळ मंगळवारी सकाळी रस्त्यावरून चालणाऱ्या ५५ वर्षीय महिलेला दोन चोरट्यांनी पोलीस बतावणी करून लुटल्याचा प्रकार घडला आहे. अर्नाळा पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून दोन्ही चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विरार पश्चिमेकडील वाय के नगर येथील स्टार प्लाण्ट हॉटेलच्या शेजारील चैतन्य बिल्डिंगमधील सदनिका नंबर ३०१ मध्ये राहणाºया मंदा अमृत डोईफोडे (५५) या मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास रस्त्यावरून जात होत्या. तेव्हाच मोटार सायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी केली.
मंदा यांना एका चोरट्याने अडवून पोलीस असल्याचे सांगत पुढे रस्त्यावर एका मुलीचा खून झाल्याचे सांगितले. आम्ही त्याची चौकशी करण्यासाठी येथे आलो असून अंगावर दागिने घालून फिरू नका असेही मंदा यांना बजावले. त्यामुळे अंगावरील सोन्याचे दागिने काढत असताना त्या दोघांनी हातचलाखी करत कागदात खडे गुंडाळून ते मंदा यांच्या साडीच्या पदराला बांधले. गैरफायदा घेत त्या चोरट्यांनी मंदा यांचे दागिने लंपास केले.