शिक्षकांविनाच सुरू होणार ग्रामीण परिसरातील शाळा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 12:46 AM2020-11-22T00:46:17+5:302020-11-22T00:46:56+5:30

मानधनावरील शिक्षकांच्या नेमणुका नाहीत : जि.प. शिक्षण विभाग सुस्त

Will schools in rural areas start without teachers? | शिक्षकांविनाच सुरू होणार ग्रामीण परिसरातील शाळा ?

शिक्षकांविनाच सुरू होणार ग्रामीण परिसरातील शाळा ?

googlenewsNext

सुरेश काटे

तलासरी : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असून मुलांचे ऑनलाइन शिक्षण चालू आहे, पण या ऑनलाइन शिक्षणाचा तलासरी तालुक्यात बट्ट्याबोळ उडाला असतानाच आता शासनाच्या निर्णयानुसार तलासरीत सोमवारपासून शाळा सुरू होणार  आहेत. मात्र मानधनावरील शिक्षकांच्या अद्याप नेमणुकाच झालेल्या नसल्यामुळे शिक्षकांविनाच शाळा  सुरू होणार असल्याने आश्चर्य व्यक्त  होत आहे.

तलासरीत माध्यमिकच्या एकूण ४८ शाळा असून त्यापैकी ११ माध्यमिक शाळा या जिल्हा परिषदेच्या आहेत. विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता जिल्हा परिषदेने ११ माध्यमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, पण या माध्यमिकसाठी शिक्षक भरतीच करण्यात आली नाही. त्यामुळे माध्यमिकसाठी गणित, इंग्रजी, सायन्ससाठी मानधन तत्त्वावर दरवर्षी शिक्षक घेतले जातात, तर उर्वरित विषय हे प्राथमिकचे शिक्षक घेतात. जिल्हा परिषदेच्या ११ शाळांत इयत्ता ९ वीचे ८८२ विद्यार्थी आहेत, तर इयत्ता १० वीचे ५५१ विद्यार्थी आहेत. यासाठी ३३ पदे मंजूर करण्यात आली असून गेल्या शैक्षणिक वर्षात ३३ पदांपैकी २७ पदे भरण्यात आली होती, तर ६ पदे  रिक्त होती.

माध्यमिक शाळांसाठी मंजूर असलेली ३३ पदे भरणे किंवा गेल्या वर्षीच्या मानधनावरील शिक्षकांना पुन्हा नियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेने काढणे आवश्यक असताना ते न काढल्याने संबंधित शिक्षकांना आदेशाशिवाय शिकवायला जायचे कसे, हा प्रश्न पडला आहे, तर प्राथमिकच्या शिक्षकांना ५० टक्क्यांनुसार हजेरी आवश्यक असल्याचे सांगितले, तर माध्यमिकला शिकविण्यासाठी प्राथमिकच्या शिक्षकांना स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणारी माध्यमिकची शाळा शिक्षकांविनाच सुरू होणार आहे.

माध्यमिकच्या शाळा सुरू करण्याचे आदेश मिळताच खासगी शाळांनी आपल्या शिक्षकांच्या कोरोना  चाचण्या करून घेतल्या असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी  स्पष्ट केले, तर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यासाठी ना शिक्षकांच्या नेमणुका ना कोरोना चाचण्या. यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Web Title: Will schools in rural areas start without teachers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.